भारतीय महिला हॉकी संघाची अनुभवी बचावपटू सुनीता लाक्राकडे आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचं नेतृत्व करणार आहे. १३ मे पासून कोरियात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची अनुभवी कर्णधार राणी रामपाल हिला विश्रांती देण्यात आली असून, गोलकिपर सविता संघाची उप-कर्णधार असणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आपले जुने प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ पुन्हा एकदा उठावदाक कामगिरी करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २०१६ साली झालेल्या स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत चीनवर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना जपानविरुद्ध होणार आहे.

असा असेल भारताचा महिला हॉकी संघ –

गोलकिपर – सविता, स्वाती

बचावफळी – दिपीका, सुनिता लाक्रा (कर्णधार), दिप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, सुमन देवी

मधली फळी – मोनिका, नमिता टोपो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलीमा मिन्झ, नवज्योत कौर, उदीता

आघाडीची फळी – वंदना कटारीया, लारेमिसामी, नवनीत कौर, अनुपा बर्ला