दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीच्या संघाने मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने पहिल्या षटकापासून फटकेबाजी सुरू केली होती, पण त्यात त्यांचेच फलंदाज अडकले. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दोघेही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. आर्चरने धवनला ५ धावांवर तर पृथ्वी शॉला १९ धावांवर माघारी धाडले.
सलामीवीर बाद झाल्यावर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांमध्ये चांगली भागीदारी होईल अशी अपेक्षा होती पण तेवढ्यात दिल्लीच्या डावात माशी शिंकली. सहाव्या षटकात श्रेयस अय्यर खेळपट्टीवर स्थिरावला होता. तो १७ चेंडूत २२ धावांवर खेळत होता. अँड्र्यू टायच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न करतानाच गोंधळ झाला. चेंडू यशस्वी जैस्वालच्या हातात गेला आणि पंतने धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे अचानक माघारी फिरलेल्या अय्यरला वेळेत क्रीजमध्ये पोहोचता आलं नाही. मुंबईकर जैस्वालने लांबून थेट थ्रो केला आणि मुंबईकर श्रेयस अय्यरला धावचीत करत माघारी धाडलं.
अय्यर बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील लगेचच धावबाद झाला. त्याने ५ धावा केल्या. त्यानंतर मार्कस स्टॉयनीसने धमाकेदार खेळी केली. त्याने ४ षटकारांसह ३० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तर शिमरॉन हेटमायरनेही तुफान फलंदाजी केली. ५ षटकारांसह २४ चेंडूत त्याने ४५ धावा केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 9, 2020 9:04 pm