कोणाच्याही ध्यानी-मनी नसताना महेंद्रसिंह धोनीने १५ ऑगस्टला संध्याकाळी निवृत्तीची घोषणा करत सर्वांना धक्का दिला. धोनीच्या निवृत्तीची बातमीने मिळालेल्या धक्क्यातून चाहते सावरतात न सावरतात तोच त्याचा सहकारी सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. सगळीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु असताना भारतीय संघासाठी सुरेश रैनाचं योगदानही विसरता येणार नाही. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करणारा भरवशाचा फलंदाज, कामचलाऊ फिरकीपटू आणि उत्तम क्षेत्ररक्षक अशी तिहेरी भूमिका रैनाने भारतीय संघात निभावली. सध्या रैना धोनीसोबत चेन्नईत आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी करतो आहे.

काही दिवसांपूर्वीच रैना दुसऱ्यांदा बाबा झाला. रैनाची पत्नी प्रियांकाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. रैनाच्या निवृत्तीची बातमी समजल्यानंतर पत्नी प्रियांकानेही ट्विटरवर त्याचं अभिनंदन करत…मला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. जाणून घ्या काय म्हणाली आहे रैनाची बायको…

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रैनाने अनेक महत्वाचे विक्रम केले. कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारात शतकं झळकावणारा रैना हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नसलं तरीही आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये तो खेळत होता. भारतीय संघात रैना आणि धोनीचा याराना हा परिचीत आहे. त्यामुळे आपल्या मित्रापाठोपाठ निवृत्ती स्विकारणं रैनाने पसंत केलं.