बुडापेस्ट, हंगेरी येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या सुशील कुमारसह अरुण कुमारला राखीव खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. लंडन ऑलिम्पिकनंतर सुशील कुमार व्यावसायिक स्पर्धेत सहभागी झालेला नाही. खांद्याच्या दुखापतीने त्याला त्रस्त केले होते. मात्र मी दुखापतीतून पूर्ण सावरलो असून, या स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शनासाठी सज्ज असल्याचे सुशील कुमारने सांगितले.
१६ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत ग्रीको रोमन, फ्रीस्टाइल आणि महिला कुस्ती या प्रकारांत स्पर्धा रंगणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त गुडघ्याच्या दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नाही.
भारतीय संघ पुढील प्रमाणे
फ्रीस्टाइल : अमित कुमार (५५ किलो), बजरंग (६० किलो), अरुण कुमार/ सुशील कुमार (६६ किलो), नरसिंग यादव (७४ किलो), पवन कुमार (८४ किलो), सत्यावर्त काडिअन (९६ किलो), हितेंदर (१२० किलो). ग्रीको रोमन : गौरव शर्मा (५५ किलो), रविंदर सिंग (६० किलो), संदीप तुलसी यादव (६६ किलो), रजबीर चिक्कारा (७४ किलो), हरप्रीत सिंग (८४ किलो) आणि नवीन (१२० किलो).