ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परतलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात लाजिरवाणा पराभव पदरी आल्यानंतरही मालिका विजय मिळवल्याने भारतीय संघांचं सर्वत्र कौतुक होत आहे. या विजयात अनुभवी खेळाडूंसोबतच नवख्या खेळाडूंचाही हात आहे. तामिळनाडूच्या टी नटराजन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अप्रतिम कामगिरी केली. गावी परतल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आलं. या कामगिरीमागे नक्की काय गुपित होतं? हे त्याने या स्वागतानंतर सांगितलं.

सेहवागने शेअर केला भन्नाट VIDEO; म्हणाला, “बिवी की लाठी…”

नटराजन याचं पदार्पणाच्या बाबतीत नशीब खूपच चांगलं होतं. त्याला एकाच दौऱ्यात टी२०, वनडे आणि कसोटी अशी तीनही आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. या कामगिरीमागचं रहस्य त्याने उलगडलं. “ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघासमोर मी दमदार कामगिरी करू शकलो यात मला आनंद आहे. इतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये असताना मला धीर दिला आणि खूप मदत केली. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी विश्वासाने खेळपट्टी गाठली. जेव्हा मला पदार्पणाची संधी मिळाली तेव्हा मला खूपच दडपण आलं होतं. पण साऱ्या सहकाऱ्यांनी मला मदत केली. त्यानंतर मग मैदानात उतरल्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे बळी टिपायचे हेच माझं लक्ष्य होतं”, असं नटराजनने सांगितलं.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

दरम्यान, नटराजनने पहिल्याच दौऱ्यात थेट दिग्गज गोलंदाज जहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. वन डे, टी२० आणि कसोटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात दोन किंवा दोनपेक्षा अधिक गडी मिळवणारा नटराजन केवळ दुसरा भारतीय डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला होता. भारतात परतल्यानंतर तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यातील चिन्नपमपट्टी गावात नटराजन गुरूवारी पोहोचला. नटराजन याचं त्याच्या गावात जल्लोषात स्वागत झालं. त्याच्यासाठी चक्क घोड्याचा रथ आणण्यात आला होता. बग्गीत बसवून त्याला मिरवत-मिरवत घरी नेण्यात आलं. या सगळ्या मिरवणुकीत त्याला शेकडो चाहत्यांनी सतत घेरल्याचं दिसून आलं.