भारतीय खेळाडूंसाठीच्या करारपद्धतीत बीसीसीआयने महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता फक्त टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाही BCCI सोबत करारबद्ध होता येणार आहे. किमान १० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंना या सुविधेचा फायदा होणार आहे. याआधी फक्त वन-डे आणि कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनाच बीसीसीआयच्या करारश्रेणीत स्थान मिळायचं. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीच्या कार्यकाळात टी-२० खेळणाऱ्या खेळाडूंना करारश्रेणीत स्थान मिळत नव्हतं. परंतू नव्याने निवडणुका झाल्यानंतर बीसीसीआयने करारपद्धतीत बदल केला आहे.

“बीसीसीआयने आपल्या करारपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार एका वर्षात किमान १० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूलाही बीसीसीआयच्या करारश्रेणीत स्थान मिळू शकणार आहे.” BCCI मधील सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. बीसीसीआय भारतीय खेळाडूंसाठी A+, A, B, C अशा चार गटांत विभागणी करतं. या गटवारीप्रमाणे भारतीय खेळाडूंना अनुक्रमे ७ कोटी, ५ कोटी, ३ कोटी आणि एक कोटीचं मानधन मिळतं.