IPL 2020 स्पर्धा युनायटेड अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवली जाणार आहे. IPL गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी याबद्दल माहिती दिली. गव्हर्निंग काऊन्सिलच्या आगामी बैठकीत याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तारखांबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून, २६ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात IPL 2020चे आयोजन केले जाण्याची शक्यता रंगली आहे. ICCने ऑस्ट्रेलियात होणारा T20 World Cup पुढे ढकलल्यानंतर IPLच्या चर्चा सुरू झाल्या. पण ही बाब पाकिस्तानी खेळाडूंना रूचलेली नाही.

“वर्ल्ड कप खेळता येऊ शकतो असे सातत्याने आम्ही सांगत होतो. पण भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी तसं होऊ देणार नाही हे वाटत होतं आणि तसंच झालं. आयपीएलचं कोणत्याही प्रकारे नुकसान होता कामा नये, ते झालंच पाहिजे मग त्यासाठी टी-२० वर्ल्डकप खड्ड्यात गेला तरी चालेल, अशी भूमिका दिसून आली. अशा प्रकारच्या स्पर्धेने लोक खेळाकडून लाखो डॉलर्स मिळवत राहतील, पण क्रिकेटची गुणवत्ता खालावली जाईल”, अशी खदखद पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने जिओ टीव्हीशी बोलताना व्यक्त केली.

“एखादा सामर्थ्यवान माणूस किंवा एक शक्तिशाली क्रिकेट बोर्ड जे धोरण ठरवतात, तेच होतं आणि त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. वर्ल्ड कप आणि आशिया चषक यावर्षी खेळला जाऊ शकत होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट पाहण्याची ती एक संधी होती, पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही”, अशी टीका त्याने ICCवर अप्रत्यक्षपणे केली.