ऋषभ पंतची यष्टीरक्षण आणि फलंदाजीतली खराब कामगिरी हा गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. विश्वचषकानंतर धोनीला विश्रांती दिल्यानंतर निवड समितीने पंतला संधी दिली. मात्र विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि पाठोपाठ बांगलादेशविरुद्ध टी-२० सामन्यातही त्याने निराशाच केली आहे. यासाठीच निवड समितीने कसोटी सामन्यांसाठी अनुभवी वृद्धीमाना साहालाच आपली पसंती देत, पंतला संघाबाहेर केलं. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक नयन मोंगियानेही पंतला वेळेतच स्वतःची कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

“ऋषभ पंत गुणी खेळाडू आहे, मात्र त्याला अजुन खूप काही शिकायचंय. सतत सराव करत राहणं गरजेचं आहे, ज्या-ज्या सामन्यांमध्ये संधी मिळते त्या सामन्यांत चांगली कामगिरी करत रहायला हवी. यष्टीरक्षण ही अशी गोष्ट आहे की प्रत्यक्ष सामन्यात तुम्ही ती अधिक शिकता. नेट्समध्ये सरावादरम्यान फार क्वचित तुमच्याकडे चेंडू येतो, त्यामुळे अशा सरावाला अर्थ नसतो. सध्यातरी पंतकडे अडचणींवर मात करत सतत सराव करत राहण्याचाच पर्याय आहे.” मुंबईत एका खासगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आला असताना मोंगिया बोलत होता.

यष्टीरक्षक जितक्या कमी चुका करतो तितका तो अधिक शिकत जातो. यामुळे गोलंदाजालाही एका प्रकारे विश्वास मिळतो. सध्या ऋषभची जागा घेण्यासाठी काही चांगले यष्टीरक्षक तयार आहेत, त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ऋषभने वेळेतच स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करणं गरजेचं आहे, मोंगिया पंतच्या कामगिरीबद्दल बोलत होता.