भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका

बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बाल लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळे त्याने आगामी भारत दौऱ्यातून माघार घेतली आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) त्याच्या जागी डावखुरा फलंदाज इम्रूल कायेस याची निवड केली आहे.

बांगलादेशच्या भारत दौऱ्याला तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेद्वारे ३ नोव्हेंबरपासून दिल्ली येथे सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे राजकोट आणि नागपूर येथे खेळला जाणार आहे. त्यानंतर बांगलादेश संघ भारताविरुद्ध इंदूर (१४ ते १८ नोव्हेंबर) आणि कोलकाता (२२ ते २६ नोव्हेंबर) येथे दोन कसोटी सामनेही खेळणार आहे.

‘‘नुकताच दुखापतीतून सावरलेल्या तमिमचा बांगलादेशच्या ट्वेन्टी-२० संघात समावेश करण्यात आला होता. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आपण खेळू शकणार नसल्याचे तमिमने अगोदरच बीसीबीला कळवले होते. पण प्रसूती जवळ आल्यामुळे त्याने पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे बांगलादेशचे निवड समिती अध्यक्ष मिन्हाजूल अबेदीन यांनी सांगितले.

ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ

शकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, इम्रूल कायेस, सौम्या सरकार, मोहम्मद नईम, मुशफिकर रहीम, महमुदुल्ला, अफिफ होसेन, मोसाद्देक होसेन, अमिनूल इस्लाम, अराफत सनी, अल-अमिन होसेन, मुस्तफिझुर रहमान, शफिउल इस्लाम.