IND vs AUS: ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केलं. या विजयाबरोबरच भारतीय संघाने दोन मोठे पराक्रम केले.
मॅच जिंकण्यासाठी खेळायचं तेव्हाच ठरवलं- अजिंक्य रहाणे
ब्रिस्बेनच्या मैदानावर गेली ३२ वर्षे ऑस्ट्रेलियाचा संघ अजिंक्य होता. कोणत्याही पाहुण्या संघाला त्या मैदानावर कसोटीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारता आली नव्हती. पण आजच्या सामन्यात ऋषभ पंतच्या शेवटच्या चौकारासह ऑस्ट्रेलियाचा अबाधित राहिलेला विक्रम अखेर मोडीत निघाला. ऋषभ पंतने दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. याचसोबत टीम इंडियाने आणखी एक विक्रमही रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यशस्वीपणे मोठ्या आव्हानांचा पाठलाग करणाऱ्या संघाच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला. वेस्ट इंडिजने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ४०६ धावांता यशस्वी पाठलाग केला होता. तर इंग्लंडने चेन्नईमध्ये ३८७ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर आज भारताने ब्रिस्बेनमध्ये ३२८ धावांता यशस्वी पाठलाग करत तिसरं स्थान पटकावलं.
काय म्हणाला कर्णधार अजिंक्य रहाणे…
“आजचा हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा विजय शब्दात कसा वर्णन करावा हे मला माहिती नाही. आमच्या संघातील साऱ्या खेळाडूंचा मला अभिमान आहे. आम्हाला आमच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. मी जेव्हा फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच आम्हीच ठरवलं की जिंकण्यासाठी खेळायचं. मग मी माझ्या पद्धतीने खेळलो, कारण आमच्याकडे ऋषभ पंत आणि मयंक अग्रवाल हे दोघे शिल्लक होते. पुजाराला तर या विजयाचे श्रेय दिलेच पाहिजे. त्याने दडपणाचा चांगला सामना केला आणि त्यानंतर पंतने तर सामन्याचा शेवट अगदी उत्तम केला”, अशा भावना अजिंक्यने व्यक्त केल्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 3:31 pm