राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सहाय्यक मार्गदर्शकही दौऱ्यावर

माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख राहुल द्रविड याच्याकडे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जून महिन्यापासून प्रदीर्घ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. १८ ते २२ जूनदरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. विलगीकरणाच्या नियमांमुळे भारतीय खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सहाय्यक प्रशिक्षकही या संपूर्ण काळात इंग्लंडमध्येच वास्तव्यास असतील.

त्यामुळे जुलै महिन्यात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघासोबत ४८ वर्षीय द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवले जाऊ शकते. त्याशिवाय ‘एनसीए’मधील अन्य सहाय्यक प्रशिक्षकही द्रविडच्या मदतीला असण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत भारताची संघनिवड अपेक्षित आहे. या दौऱ्यात भारत-श्रीलंका संघात १३, १६ आणि १९ जुलै रोजी अनुक्रमे तीन एकदिवसीय सामने, तर २२, २४ आणि २७ जुलै रोजी तीन ट्वेन्टी-२० लढती खेळवण्यात येतील. सर्व सामने कोलंबो येथे होतील.

‘‘श्रीलंका दौऱ्यासाठी राष्ट्रीय निवड समिती अनेक नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देणार आहे. या दौऱ्यासाठी द्रविडला मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासह पाठवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. द्रविडला गेल्या अनेक वर्षांपासून ‘एनसीए’ येथे प्रशिक्षण देण्याबरोबरच भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघांनाही मार्गदर्शन करण्याचा अनुभव आहे. ‘बीसीसीआय’ आणि द्रविड यांच्यात याविषयी चर्चा सुरू असून द्रविडच्या मदतीला ‘एनसीए’मधील सहाय्यक प्रशिक्षकांची फळीही असेल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारताला विजयाची संधी -द्रविड

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघ ३-२ अशा फरकाने जिंकेल, असे भाकीत माजी फलंदाज राहुल द्रविडने वर्तवले आहे. ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत मिळवलेले यश आणि त्यानंतर मायदेशात इंग्लंडलाही धूळ चारल्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यात भारताचे पारडे जड असेल. इंग्लंडचा संघ त्यांच्या मैदानावर सर्वोत्तम असला, तरी भारतीय संघ ही मालिका ३-२ अशी जिंकेल. भारताची वेगवान गोलंदाजांची फळी आणि फलंदाजांमधील परिपक्वता, अनुभव यामागील मुख्य कारण आहे,’’ असे द्रविड म्हणाला.

धवन-हार्दिक कर्णधारपदाच्या शर्यतीत

भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्यापैकी एकाकडे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. जुलै महिन्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल इंग्लंड दौऱ्यावर असतील. तर श्रेयस अय्यरच्या समावेशाबाबत अद्याप साशंकता आहे. त्यामुळे धवन आणि हार्दिक यांच्यापैकी कोणाची कर्णधारपदी निवड केली जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.