आयपीएलचा तेरावा हंगाम आटोपून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून भारतीय संघ या मालिकेत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर खेळत असताना टीम इंडियाच्या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांकडून उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागणार आहे. मिचेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन, हेजलवूड असे एकापेक्षा एक नावाजलेले ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज विरुद्ध भारताचे फलंदाज यांच्यातला हा सामना पाहणं क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असते. यासाठी टीम इंडियाने सरावाला सुरुवात केली असून एक खास टेक्निक वापरत सराव केला जात आहे.

लॉकडाउनपश्चात टीम इंडियाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे. २०२० वर्षात फेब्रुवारीत न्यूझीलंड दौरा आटोपून मायदेशी परतलेल्या भारतासमोर मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा दौरा रद्द करावा लागला होता.