IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंत याला अखेर BCCI कडून मंगळवारी दिलासा मिळाला. लोकपाल डी. के. जैन यांनी त्याच्यावरील आजीवन बंदी हटवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली. त्यानुसार सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीचा कालावधी संपत आहे. त्यानंतर श्रीसंत पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळताना दिसू शकतो. याबाबत बोलताना श्रीसंतने कारकिर्दीत १०० बळी टिपण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवल्यानंतर अनेक आजी माजी खेळाडूंनी त्याचे अभिनंदन केले. श्रीसंतच्या पुनरागमनाबाबत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मत व्यक्त केले आहे. “श्रीसंतने बंदीची शिक्षा संपल्यानंतर आधी देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावेत आणि त्यानंतरच टीन इंडियामध्ये खेळावे,” असे सेहवाग म्हणाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याला बंदीच्या शिक्षेनंतर थेट पाकिस्तानच्या संघात स्थान देण्यात आले होते. त्याचे कनेक्शन श्रीसंतची जोडणारा एक प्रश्न सेहवागला वितारण्यात आला. त्यावर ‘पाकिस्तानात काहीही घडत असतं’, असं भन्नाट उत्तर सेहवागने दिलं.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर  हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय BCCI ने घेतला होता. त्यानुसार मंगळवारी त्याच्यावरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार आहे.

श्रीसंतने आपल्या उमेदीच्या काळातील बराचसा काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतू शकतो, असे निरीक्षण लोकपाल डी के जैन यांनी नोंदवले.