भारतीय संघ सध्या विंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील शेवटचा टप्पा सुरू असून पहिली कसोटी सुरू आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ७५ धावांची आघाडी मिळवली. इशांतने पाच बळी मिळवल्यामुळे विंडीजचा पहिला डाव २२२ धावांत संपुष्टात आला. तसेच कोहली आणि रहाणे यांच्यातील भागीदारीच्या जोरावर भारतीय संघ सामन्यात भक्कम स्थितीत आहे. पण तरीदेखील भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मात्र संघ निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे.

“विराटने संघ निवडीच्या प्रक्रियेत सातत्य राखायला हवे. खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात यायला हवी. असे केल्यास त्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्यांना सूर गवसण्यास मदत होईल. सतत संघात बदल करणे योग्य नाही. गेल्या कसोटी सामन्यात फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर कुलदीप यादवने ५ बळी टिपले. तरीदेखील कुलदीप यादवला संघात न घेतल्याचे मला फारच आश्चर्य वाटले”, अशा शब्दात त्याने नाराजी व्यक्त केली.

“एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यर ज्या प्रकारे खेळला ते आपण पाहिले. तुम्ही त्याला संघात स्थान दिले आणि त्याला खेळण्याचे स्वातंत्र्य दिले की तो कसा खेळ करतो हे साऱ्यांनीच बघितले. अशाच प्रकारचे स्वातंत्र्य अनेक खेळाडूंना द्यायला हवे, तरच चांगला संघ तयार होईल. विराट भविष्यात ही गोष्ट लक्षात ठेऊन नक्कीच तसे करेल”, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केले.

दरम्यान, पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेने अर्धशतक साकारल्यानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाचे (५८) अर्धशतक आणि इशांतने (१९) उपयुक्त योगदान दिल्यामुळे भारताचा पहिला डाव २९७ धावांवर संपुष्टात आला. जाडेजा व इशांत यांनी आठव्या गड्यांसाठी ६० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी विंडीजवर वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, रवींद्र जाडेजा आणि इशांत शर्मा यांनी पहिल्या स्पेलमध्ये प्रत्येकी एकेक बळी टिपला. विंडीजची ४ बाद ८८ अशी अवस्था झाली होती. इशांतचे दुसऱ्या स्पेलसाठी आगमन होताच विंडीजची फलंदाजी ढेपाळली. इशांतने कारकीर्दीत नवव्यांदा पाच बळी घेण्याची किमया साधली.