भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २४ फेब्रुवारीपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मालिकांमध्ये भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ तयार आहे. सर्व खेळाडू या मालिकेसाठी सराव करत आहेत. आपल्या फटकेबाज खेळीची ओळखला जाणारा ऋषभ पंत याने कोणत्या परिस्थितीमध्ये कसा खेळ करावा हे मला समजतं, असं विधान केले आहे.

मी माझ्या आयुष्यात जितकं क्रिकेट खेळलो आहे, त्यात मला आता समजू लागले आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये कसे खेळावे. तुम्हाला खेळताना आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे महत्वाचे असते. कारण क्रिकेटमध्ये मैदानावर टिकून राहण्यापेक्षा धावा काढणे हे अधिक गरजेचे असते. त्यामुळे मी केवळ माझ्या सरावाच्या पद्धतीवर लक्ष देतो. मी चांगली कामगिरी करतो आहे की वाईट कामगिरी करतो आहे, याकडे मी जास्त लक्ष देत नाही. कारण निकाल जरी महत्वाचा असला, तरी त्या निकालापर्यंत पोहोचण्याची पद्धतदेखील तितकीच महत्वाची असते. मी आज जे काही आहे, ते सारं मी ज्या पद्धतीने आजपर्यंत सराव केला त्या पद्धतीमुळेच आहे, असे तो म्हणाला.

क्रिकेटचा प्रत्येक फॉरमॅट हा वेगळा असतो आणि त्याचा आपल्या कामगिरीवरही प्रभाव दिसून येतो. जेव्हा तुम्ही षटकार लगावण्याचा प्रयत्न करताना बाद होता, तेव्हा सारे जण तो बेजबाबदार फटका असल्याची टीका करतात. पण तोच फटका जेव्हा षटकार ठरतो, तेव्हा मात्र कोणीही त्याबाबत फारसे काही बोलत नाही. मी १० सामने खेळलो, त्यापैकी ९ सामन्यांचा निकाल माझ्या संघाच्या बाजूने लागला तर ते माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, असेही त्याने स्पष्ट केले.