सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. लॉकडाउन काळात भारतीय खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांशी गप्पा मारत क्रिकेटच्या आठणींना उजाळा देत आहेत. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर, मुंबईकर खेळाडू अमोल मुझुमदारसोबतचा फोटो पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. अमोल मुझुमदारला भारतीय कसोटी संघात स्थान न मिळणं हा भारतीय संघाचा सर्वात मोठा तोटा असल्याचं रवी शास्त्रींनी म्हटलं आहे.

रणजी क्रिकेटमध्ये अमोल मुझुमदारचं नाव हे गाजलेलं होतं. आपल्या काळात अमोलने मुंबई, आसाम आणि आंध्र प्रदेश या ३ संघांचं प्रतिनिधीत्व केलं. खडूस मुंबईकर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमोलला भारतीय संघात स्थान मिळवता आलं नाही. अमोल मुझुमदारनेही रवी शास्त्रींनी शेअर केलेल्या फोटोवर आपली प्रतिक्रीया देत त्यांचे आभार मानले आहेत.

१९९३-९४ च्या हंगामात अमोल मुझुमदारने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. हाच हंगाम रवी शास्त्री यांचा स्थानिक क्रिकेटमधला अखेरचा हंगाम होता. आपल्या पदार्पणाच्या हंगामात अमोल मुझुमदारने उपांत्यपूर्व सामन्यात हरियाणाविरुद्ध नाबाद २६० धावांची खेळी केली होती. याव्यतिरीक्त सौरव गांगुली, राहुल द्रविड या खेळाडूंसोबत अमोल १९ वर्षाखालील संघाकडून खेळला आहे. आपल्या १७१ प्रथमश्रेणी सामन्यात अमोलने ११ हजार १६७ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ३० शतकं तर ६० अर्धशतकं जमा आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर अमोलने प्रशिक्षणाकडे आपला मोर्चा वळवला.