नवी दिल्लीतील डॉ.  कर्णी सिंह नेमबाजी श्रेणीत सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. तेजस्विनीने संजीव राजपूतसह 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र गटात ही कामगिरी नोंदवली. अंतिम सामन्यात त्यांनी युक्रेनच्या सेर्ही कुलिश आणि अॅना इलिना यांचा 31-22 असा पराभव केला.

या विश्वचषकातील भारताचे हे 11वे सुवर्णपदक आहे. दरम्यान, ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि सुनिधी चौहान यांनी अमेरिकेच्या टिमोथी शेरी आणि व्हर्जिनिया थ्रेशरचा 31-15 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. यापूर्वी राजपूत आणि तेजस्विनीने 588 गुण मिळवून अंतिम पात्रता फेरी गाठली होती. दोन्ही नेमबाजांनी 294–294 गुण घेतले.

गुरप्रीतसिंग, अनीश भानवाला आणि विजयवीर सिद्धू हे तिन्ही भारतीय नेमबाज पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. यापूर्वी, महिलांच्या 25 मीटर पिस्तूल स्पर्धेतील तिन्ही पदके भारताला मिळाली आहेत. या प्रकारात चिंकी यादवने सुवर्ण, राही सरनोबतने रौप्य तर मनु भाकेरने कांस्यपदक जिंकले आहे.

आता आम्हाला कोणतीही विश्रांती मिळणार नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी आता आमच्याकडे फक्त काही दिवस, काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. ऑलिम्पिकपूर्वी भरपूर स्पर्धाही होणार नाहीत. त्यामुळे येणारी प्रत्येक स्पर्धा ही आमच्यासाठी नवे काही शिकवणारी तसेच आमचे कौशल्य सुधारण्याची संधी देणारी असेल. या स्पर्धेद्वारे आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलो.
– राही सरनोबत

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेआधीची ही अखेरची आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होती. त्यामुळे आता आम्हाला राष्ट्रीय स्पर्धांची तयारी करावी लागेल. राष्ट्रीय स्पर्धांच्या तारखा बदलल्यास काय करता येईल, याचा विचार करावा लागणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आम्हाला पूर्णपणे सज्ज राहावे लागेल.
– चिंकी यादव