Thailand Open 2018 : रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तिने उपांत्यपूर्व सामन्यात मलेशियाच्या सोनिया चिह हिला २१-१७, २१-१४ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. एकूण ३६ मिनिटे चाललेल्या सामन्यात सिंधूने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले. पुढील फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रिगोरिया मारिष्का हिच्याशी होणार आहे.

उपउपांत्यपूर्व सामन्यात सिंधूने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिच्यावर २१-१६, २१-१४ अशी सरळ गेममध्ये मात केली होती. त्यामुळे या सामन्यात सिंधू सोनियापुढे विश्वासाने सामना खेळण्यासाठी उभी ठाकली. सिंधूने सामन्यातील पहिला गुण मिळवून सुरुवात केली. पुढे सोनियाने गेममध्ये १२-८ अशी आघाडी घेतली होती. पण सिंधूने पुनरागमन करत बरोबरी साधली आणि त्याच लयीत खेळत पहिला गेम आपल्या नावावर केला. जागतिक क्रमवारीत ३५व्या क्रमांकावर असलेल्या सोनियाने पुढील गेममध्ये आपला खेळ आक्रमक करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेही सिंधूने बाजी मारली आणि सामना जिंकून उपांत्य फेरी गाठली.

दरम्यान, काल पुरुषांच्या एकेरीत कश्यपला जपानच्या कांता त्सुनियामा याच्याकडून १८-२१, २१-१८, १९-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. तर चौथ्या मानांकित एच.एस.प्रणॉयला इंडोनेशियाच्या सोनीद्वे कुन्कोरो याने २१-१८, २१-१४ असे पराभूत केले. याशिवाय, दुहेरीत मनू अत्री व बी. सुमेध रेड्डी यांना हिरोयोकी इन्दो व युता वातानाबे यांच्याकडून २४-२२, १३-२१, १९-२१ अशी हार मानावी लागली. मिश्र दुहेरीत जपानच्या युकी कानेको व व मोयू मत्सुमोतो यांनी सात्त्विकसाईराज रान्किरेड्डी व अश्विनी पोनप्पा यांना २१-११, २१-१६ असे पराभूत केले.