लॉर्ड्स येथे खेळवण्यात आलेला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी ड्रॉ झाला आहे. न्यूझीलंडने इंग्लंडला २७३ धावांचे लक्ष्य दिले होते, पण इंग्लंडने हा सामना अनिर्णीत ठेवला. ७० षटके खेळल्यानंतर इंग्लंडने ३ गडी बाद १७० धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला.

कालच्या २ बाद ६२ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास न्यूझीलंडने नील वॅग्नरला गमावले. त्याने १० धावा केल्या. यानंतर टॉम लाथम देखील ३६ धावा करून बाद झाला. सामन्याचा शेवटच्या दिवशी रॉस टेलरने काही आकर्षक फटकेबाजी करत ३३ धावा केल्या. हेन्री निकोल्सनेही २३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषित केला आणि इंग्लंडला ७३ षटकांत २७३ धावांचे लक्ष्य मिळाले. दुसर्‍या डावात इंग्लंडकडून रॉबिन्सनने ३, तर ब्रॉड, रूट आणि वुड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

 

प्रत्युत्तरात इंग्लंडने दुसर्‍या डावात चांगली सुरुवात केली. रोरी बर्न्स आणि डोम सिब्ले यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. बर्न्स २५ धावा करून बाद झाला, त्यानंतर जॅक क्रॉले २ धावा काढून तंबूत परतला. यानंतर जो रूट आणि सिब्ले यांनी चांगली फलंदाजी केली आणि तिसर्‍या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ४० धावा केल्यावर रूट बाद झाला, तेव्हा फक्त १९ षटके बाकी होती. दुसरीकडे संथ फलंदाजी करताना सिब्लेने अर्धशतक झळकावले. इंग्लंडने ७० षटकांत ३ गडी राखून १७० धावा केल्या. सिब्लीने नाबाद ६० आणि ओली पोपने नाबाद २० धावा केल्या. न्यूझीलंड संघाकडून वॅगनरने २ गडी बाद केले.

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या डावात ३७८ धावा फटकावल्या, त्यात पदार्पणवीर डेव्हन कॉनवेच्या २०० धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव २७५ धावांवर आटोपला.