ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. बुधवारी आयसीसीच्या बैठकीत टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आयसीसीने स्पर्धेच्या आयोजनाबद्दलचा निर्णय जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे. दरम्यानच्या काळात टी-२० विश्वचषक आणि २०२१ साली महिला क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनासाठी काही पर्याय उपलब्ध होतात का याबद्दल आयसीसी विचार करणार आहे.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन ,करण्यात आलं होतं. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत टी-२० विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करण्याबद्दल अनेक बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता. परंतू गेल्या काही महिन्यांमध्ये करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकाच्या सुरक्षेचा विचार करुन नवीन पर्याय शोधण्यावर आयसीसी बैठकीत एकमत झालं आहे.

“करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हळुहळु सुधारणा होते आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आम्ही अजुन एक महिन्याचा कालावधी घेत पर्यायांचा विचार करणार आहोत. प्रत्येक घटकाची सुरक्षा हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याची केवळ एक संधी आमच्याकडे आहे, आणि त्या संधीचा योग्य वापर आम्हाला करायचा आहे. त्यामुळे आयसीसीशी संलग्न क्रिकेट बोर्ड, सरकारी यंत्रणा, ब्रॉडकास्टर्स यांच्याशी सल्लामसलत करुन योग्य निर्णय घेतला जाईल व त्याबद्दल माहिती देण्यात येईल.” आयसीसीचे Chief Executive मनु श्वानी यांनी माहिती दिली.