क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख कपिल देव यांचे स्पष्टीकरण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांची पुनर्निवड करताना कर्णधार विराट कोहलीच्या पसंतीचा प्रश्न नव्हता, असे क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख कपिल देव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

‘‘प्रशिक्षकपदाचा निर्णय घेण्यासाठी आम्ही कुणाचेही मत विचारलेले नाही. आम्ही कोहलीचे मत विचारात घेतले असते, तर संपूर्ण संघाचेही मत विचारात घ्यावे लागले असते. शास्त्री २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत भारताचे प्रशिक्षक असतील,’’ अशी प्रतिक्रिया कपिल यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

‘‘प्रशिक्षकांच्या निवडीसंदर्भात क्रिकेट सल्लागार समितीने अद्याप माझ्याशी संवाद साधलेला नाही. समितीने विचारल्यास माझी मते त्यांना सांगेन. शास्त्री यांनी गेली काही वर्षे भारतीय संघाला समर्थपणे मार्गदर्शन केले आहे,’’ असे विराट अमेरिका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला होता.

शास्त्री यांच्या निवडीसंदर्भात विचारले असता कपिल म्हणाले, ‘‘ते गोपनीय आहे. गेल्या दोन वर्षांत भारतीय संघाने मिळवलेल्या यशाचा आढावा त्यांनी सादरीकरणात घेतला. यात कामगिरी आणखी सुधारण्यासाठीच्या मुद्दय़ांचाही समावेश होता. भारतीय संघाला आगामी कालखंडात बलाढय़ करण्यासाठी ‘बीसीसीआय’कडून आणखी मुदत त्यांनी मागितली.’’

शास्त्री अन्य उमेदवारांपेक्षा कोणत्या बाबतीत वरचढ ठरले, हे मांडताना अंशुमन गायकवाड म्हणाले, ‘‘सध्या प्रशिक्षक असल्यामुळे शास्त्री सर्व खेळाडूंना ओळखतात. भारतीय क्रिकेट प्रणालीची शास्त्री यांना पुरेशी जाण आहे. खेळाडूंशी उत्तम संवाद असल्याने त्यांच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे.’’

शास्त्रीच सरस!

क्रिकेट सल्लागार समितीमधील आम्ही तिन्ही सदस्यांनी १००पैकी प्रत्येकाला गुण दिले. यासाठी प्रशिक्षणाचे कौशल्य, अनुभव आणि बांधिलकी हे निकष आम्ही प्रामुख्याने पाहिले. सर्व प्रशिक्षकांनी अप्रतिम सादरीकरण केले. आम्ही प्रत्येकाने खासगीरीत्या केलेले गुणांकनाचे बंद लिफाफे ‘बीसीसीआय’कडे सुपूर्द केले. ही प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक होती. फार थोडय़ा गुणांचा फरक प्रत्येक उमेदवारामध्ये होता. परंतु अखेरीस शास्त्री यात सरस ठरले, असे कपिल देव यांनी सांगितले.

गुणांकन पद्धती

’ मार्गदर्शनाचे तत्त्वज्ञान, प्रशिक्षणाचा अनुभव, प्रशिक्षणातील यश, सुसंवाद, आधुनिक प्रशिक्षण साधनांची माहिती अशा पाच घटकांना गुण दिले गेले.

’ खूप छान – २० गुण, छान – १५ गुण, सरासरी – १० गुण, सामान्य – ५ गुण अशी गुणांकन पद्धती वापरण्यात आली होती.

विश्वचषक जिंकून न दिल्यास प्रशिक्षकाची हकालपट्टी करावी का?

विश्वचषक क्रिकेट स्पर्धाचा आढावा घेतल्यास शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आहे. याबाबत कपिल आक्रमकतेने म्हणाले, ‘‘जर कोणताही प्रशिक्षक कोणत्याही संघाला विश्वचषक जिंकून देऊ शकला नाही, तर त्याची हकालपट्टी करावी का? नाही, तुम्ही प्रशिक्षकाच्या एकंदर मार्गदर्शन कार्यकाळाचा आढावा घ्यायला हवा. आम्ही नेमके तेच केले. त्याने आपल्या कामगिरीचे जे सादरीकरणे केले. त्याच आधारे ही निवड केली आहे.’’