आयपीएल एक अशी स्पर्धा आहे, जिथे युवा खेळाडूंना नशीब आजमावण्याची संधी मिळते. प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळेसही जगाची नजर काही तरुण खेळाडूंकडे आहे. या लीगमध्ये युवा खेळाडू जगाचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतात. यंदाही काही युवा खेळाडू पहिल्यांदा आयपीएलमध्ये सहभागी होत आहेत. सर्वांना त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे.

ललित यादव (दिल्ली कॅपिटल्स)

24 वर्षीय ललित यादव दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा खेळाडू ठरू शकतो. ललित प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. ललितमुळे दिल्लीची फलंदाजी अधिक बळकट होईल. ललित यादवने आतापर्यंत 35 टी-20 सामने खेळले आहेत आणि 149.33 च्या स्ट्राइक रेटने 560 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत ललितने 27 बळी घेतले आहेत. नुकत्याच खेळलेल्या सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये ललितने 5 डावांमध्ये 152 धावा केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे या स्पर्धेत ललितने 197.40च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

शाहरुख खान (पंजाब किंग्ज)

पंजाब किंग्जने शाहरुख खानला संघात दाखल केले आहे. शाहरुखने घरगुती क्रिकेटमध्ये आपली कामगिरी सिद्ध केली आहे. पंजाब किंग्जने शाहरुखला 5.25 कोटींची बोली लावत टीममध्ये समाविष्ट केले. यष्टीरक्षक आणि झटपट फलंदाज म्हणून शाहरुखची ओळख आहे. 2020च्या मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तामिळनाडूच्या शाहरुखने अप्रतिम कामगिरी केली. शाहरुखने सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये 4 सामन्यांमध्ये 220च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या होत्या. त्यामुळेच आयपीएलच्या लिलावात शाहरुखला 5 कोटींपेक्षा जास्त पैसे देण्यात आले. सय्यद मुश्ताक ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत शाहरुखने 19 बॉलमध्ये नाबाद 40 धावांची खेळी करत आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले.

रिले मेरीडिथ (पंजाब किंग्ज)

आयपीएल 2021च्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज रिले मेरीडिथला 8 कोटींची बोली लावत पंजाब किंग्जने आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. सीएसकेनेही या वेगवान गोलंदाजाला संघात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटी पंजाबने बाजी मारली. मेरीडिथने आतापर्यंत 34 टी-20 सामने खेळले, ज्यात त्याने 43 बळी घेतले आहेत. 2017मध्ये, रिले मेरीडिथने बिग बॅश लीगमध्ये पदार्पण केले.

वैभव अरोरा (केकेआर)

केकेएने (कोलकाता नाइट रायडर्स) युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोराला यंदा संघात घेतले आहे. घरगुती क्रिकेटमध्ये वैभव हिमाचल प्रदेशकडून खेळतो. रणजी करंडक क्रिकेट सामन्यात वैभवने सौराष्ट्राकडून खेळत पुजाराची दांडी गुल केली. तेव्हापासून क्रिकेटविश्वात वैभवविषयी चर्चा सुरू होती. वैभवने विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरूद्ध हॅट्ट्रिक घेत क्रिकेट विश्वात आपली छाप सोडली. आता वैभव प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. हिमाचल प्रदेशचा हा युवा वेगवान गोलंदाज आतापर्यंत 6 टी-20 सामने खेळला आहे आणि त्याच्या नावावर 10 बळी आहेत.

फिन एलन (आरसीबी)

फिन एलन आयपीएल 2021मध्ये आरसीबीकडून (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) खेळताना दिसणार आहे. फिन वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. पॉवरप्ले दरम्यान गोलंदाज या फलंदाजासमोर गोलंदाजी करण्यास नाखूष असतात. एलनने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत 15 टी-20 सामने खेळले आहेत.