विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवण्यास विराटसेना अपयशी ठरली आहे. २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. याआधी २०१७ मध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून भारताला मानहानीकारक पराभव स्विकारावा लागला होता. भारतीय संघाच्या या दोन पराभवांबद्दल जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपलं मत नोंदवलं आहे.

“न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात १५ मिनीटांमध्ये आम्ही ३-४ विकेट गमावल्या. त्यामुळे पूर्ण सामनाच एकतर्फी झाला. माझ्यामते आमच्या संघासाठी तो अत्यंत दुर्दैवी दिवस होता. २०१७ साली चॅम्पिअन्स ट्रॉफीबद्दल बोलायला गेलं, तर जसप्रीत बुमराहने टाकलेल्या नो-बॉलनंतर सर्व चित्रच पालटलं आणि सामना फिरला. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आम्ही खराब खेळ केला म्हणून हरतो अशातला काही भाग नाही. पण आतापर्यंत नेहमी एक दुर्दैवी गोष्ट घडते आणि संपूर्ण सामना प्रतिस्पर्धी संघाकडे पलटवण्यास ती पुरेशी होते असं घडत आलंय.” भुवनेश्वर ESPNCricinfo संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

२०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीदरम्यान पाकिस्तानी सलामीवीर फखार झमानला पहिल्यांदा भारतीय क्षेत्ररक्षकांकडून जीवदान मिळालं. यानंतर बुमराहच्या नो-बॉलमुळे झमान पुन्हा एकदा बालंबाल बचावला. या संधीचा फायदा घेत झमानने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत शतकी खेळी केली होती. या स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि भारतीय संघाचे तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात झालेल्या वादाचे अनेक किस्से प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. या पराभवानंतर कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रवी शास्त्रींची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली होती.