भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस.प्रणॉयने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या नावांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेली काही वर्ष अर्जुन पुरस्कारासाठी प्रणॉयचं नाव सातत्याने डावललं जात असल्यामुळे त्याने वारंवार सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रकुल आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदकांची कमाई केल्यानंतरही पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस होत नाही आणि जे खेळाडू स्पर्धा जिंकत नाहीत त्यांची नाव पुढे पाठवली जातात. हा देश म्हणजे एक विनोद आहे या शब्दांमध्ये प्रणॉयने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रणकीरेड्डी या दुहेरी जोडीचं आणि समीर वर्मा या खेळाडूचं नाव शिफारस केलं आहे. प्रणॉयने आपल्या ट्विटमध्ये थेट नाव न घेता या खेळाडूंवर निशाणा साधला आहे. BAI ने एस. मुरलीधरन आणि भास्कर बाबु या प्रशिक्षकांची नावं द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सुचवली आहेत.

गेल्या ४ वर्षातील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन पुरस्कारासाठी नावांची शिफारस करण्यात आल्याचं BAI ने स्पष्ट केलं होतं. याआधीही प्रणॉयचं नाव डावलण्यात आल्यानंतर त्याने, या देशात पुरस्कार देताना कामगिरीचा विचार केला जात नाही. तुमची ओळख असणं गरजेचं आहे, अशा आशयाचं ट्विट केलं होतं.