तुल्यबळ थायलंडवर मात; सायना नेहवालला पराभवाचा धक्का; ऋत्विका शिवानीचा खळबळजनक विजय
दोन वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत भारतीय महिला बॅडमिंटन संघाने कांस्यपदकाची कमाई करत पहिल्यांदाच उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत पदकाचा मान पटकावला होता. या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत भारतीय महिला संघाने कुनशान येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तुल्यबळ थायलंडला नमवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत वाटचालीसह महिला संघाचे पदक पक्के झाले आहे. युवा ऋत्विका शिवानी गड्डे गुरुवारच्या विजयाची शिल्पकार ठरली. भारताने थायलंडला ३-१ असे हरवले.
सलामीच्या लढतीत रतचन्नोक इन्टॅनॉनने सायना नेहवालवर २१-१२, २१-१९ अशी मात करत थायलंडला १-० आघाडी मिळवून दिली. काटक शरीर, कोर्टवरचा चपळ वावर आणि शैलीदार फटक्यांच्या जोरावर रतचन्नोक इन्टॅनॉने विजय साकारला. भारताच्या विजयासाठी सायनाचा सामना महत्त्वाचा होता. मात्र तिला पराभव पत्करावा लागल्याने अन्य खेळाडूंवरील दडपण वाढले.
एकेरीच्या दुसऱ्या लढतीत पी.व्ही. सिंधूने ब्युसनान ओंगबुमरुनफानवर २१-१८, २१-१७ असा विजय मिळवला. सिंधूने विजयासह भारताला १-१ बरोबरी करून दिली. दुहेरीच्या पहिल्या लढतीत ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा जोडीने पुटिल्ला सुपाजीराकुल व सॅपसिरी तेइराट्टाचाई जोडीला २१-१९, २१-१२ असे नमवले. या विजयासह भारताने २-१ अशी आघाडी घेतली.
एकेरीच्या तिसऱ्या लढतीत ऋत्विका शिवानीसमोर निचाऑन जिंदापॉलचे आव्हान होते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित निचाऑनविरुद्ध खेळण्याचे दडपण न घेता १९ वर्षीय ऋत्विकाने २१-१८, २१-१६ असा धक्कादायक विजय मिळवला. या ३-१ अशा विजयी आघाडीमुळे दुहेरीची दुसरी लढत झाली नाही.

ऋत्विका शिवानी विजयी वि. निचाऑन जिंदापॉल
२१-१८, २१-१६