ऋषिकेश बामणे

अनेक वर्षांची मेहनत आणि प्रतीक्षेनंतर मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवचे अखेर भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार झाले. किशोरवयापासूनच सर्वांमध्ये ‘सूर्या’ अथवा ‘स्काय’ नावाने लोकप्रिय असलेल्या सूर्यकुमारला अनेकांचे मार्गदर्शन लाभले. अशोक कामत-अशोक अस्वलकर ही प्रशिक्षकांची जोडी आणि वडील अशोक कुमार प्रामुख्याने या त्रिमूर्तींच्या बळावर सूर्यकुमारने इथवर मजल मारली आहे.

इंग्लंडविरुद्ध रविवारी झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याद्वारे ३० वर्षीय सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु गुरुवारी चौथ्या लढतीत त्याला प्रथमच फलंदाजीची संधी लाभली. सूर्यकुमारने या संधीचे सोने साधून अर्धशतक झळकावताना संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे सूर्यकुमारची आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

‘‘अणुशक्ती नगरच्या मैदानावर मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवड चाचणी सुरू असताना माझी १२-१३ वर्षांच्या सूर्यकुमारवर पहिल्यांदा नजर पडली. त्यावेळीच त्याची खेळण्याची शैली आणि फटक्यांची निवड पाहून एके दिवशी हा खेळाडू भारतासाठी नक्कीच खेळेल, असे मी सहकाऱ्यांना सांगितले. त्याच्या वडिलांशी संवाद साधल्यावर आम्ही सूर्यकुमारला प्रशिक्षण देण्याचे ठरवले आणि मग दिलीप वेंगसरकर अकादमीतून त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली,’’ असे प्रशिक्षक कामत म्हणाले.

‘‘अखंड परिश्रम तसेच अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर का होईना, पण सूर्यकुमारने स्वत:ला सिद्ध करतानाच माझे शब्दही खरे करून दाखवले. प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी हा क्षण अभिमानास्पद असला तरी सूर्यकुमार भारतीय संघातील स्थानाचा खरा हकदार आहे. आम्ही प्रशिक्षकांनी त्याला फक्त दिशा दाखवण्याचे कार्य केले. गेल्या दोन-तीन वर्षांत ‘आयपीएल’पासून सर्व स्थानिक स्पर्धांमध्ये छाप पाडल्याचेच हे फळ आहे,’’ असेही कामत यांनी सांगितले.