भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाला ICC नेही नुकतीच मान्यता दिली असून २०१८ च्या ICC कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आले. २२ जानेवारीला ICC च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला यंदाचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर ऋषभचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दरम्यान रिषभ पंतला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने स्लेजिंग करत एक चॅलेंज केले होते. ‘मी आणि माझी बायको बाहेर जेवायला किंवा सिनेमाला जाऊ तेव्हा तू आमची पोरं सांभाळशील का?’ असे चॅलेंज भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने केले होते. त्या संदर्भात ICC नेही खास एक स्केच काढून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. या स्केचमध्ये ऋषभ पंत याच्याबरोबर टीम पेन, त्याची पत्नी आणि दोन मुलं दाखवण्यात आली असून त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे.

त्याच्या या गौरवाची आणि स्केचची दखल ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याची पत्नी बोनी पेन हिनेही घेतली आहे. बोनी पेन हिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ICC च्या स्केचवरही टीम पेनच्या पत्नीने गमतीशीर कमेंटदेखील केली आहे.

दरम्यान, ICC Men’s ODI Team of the Year 2018 संघात रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या चौघांना स्थान देण्यात आले आहे. तर ICC Test Team of the Year 2018 संघात विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या तिघांना स्थान देण्यात आले आहे.