भारतीय महिला टेबल टेनिस स्टार मनिका बत्रासमोर संकट उभे राहणार आहे. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची (टीटीएफआय) कार्यकारी समिती मनिकाला कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे टीटीएफआयने मनिकासंबधी कठोर पाऊल उचलले आहे.

मनिकाने उत्कृष्ट खेळ करत टोक्यो ऑलिम्पिकच्या एकेरीच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. पहिल्या दोन गेममध्ये मागे पडल्यानंतर तिने खडतर सामन्यात युक्रेनच्या मार्गारिटा पेसोत्स्काला ४-३ने हरवत नेत्रदीपक पुनरागमन केले. तिचा सामना पाहून अनेकांनी तिचे कौतुकही केले होते.

 

या सामन्यात मनिका बत्रा तिच्या प्रशिक्षकांशिवाय उतरली होती. तिच्या खासगी प्रशिक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मनिकाने निषेध म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांचे मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता. मनिका बत्राचे खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांना वादग्रस्तपणे तिच्याबरोबर टोक्योला जाण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु तिला स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राष्ट्रीय संघासह राहण्याची परवानगी नव्हती. ती हॉटेलमध्ये राहत होती आणि तिला सराव करण्यासाठीच परवानगी होती.

हेही वाचा – एका महिन्यापूर्वी देशाची माफी मागणारा पाकिस्तानी क्रिकेटपटू करतोय नव्या कारकिर्दीला सुरुवात!

आयोजकांनी फेटाळली होती मनिकाची मागणी

२६ वर्षीय मनिकाला प्रशिक्षकाची मान्यता ‘अपग्रेड’ करायची होती, जेणेकरून ती तिच्या सामन्यादरम्यान प्रशिक्षकांनाही कोर्टात आणू शकेल. परंतु टीमचे प्रमुख एम. पी. सिंग यांनी सांगितले, की मनिकाच्या प्रशिक्षकांना कोर्टावर घेऊन येण्याची परवानगी आयोजकांनी फेटाळून लावली आहे. एम. पी. सिंग हे टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाची सल्लागार आहेत.