‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांचे संकेत

टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारताच्या पुरुष आणि महिला ध्वजवाहकाची घोषणा जून महिन्याच्या अखेरीस केली जाईल. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी दोन ध्वजवाहक निवडण्यात येतील, असे संकेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी दिली.

‘‘ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे सर्व संघ जाहीर झाल्यानंतरच ध्वजवाहकाची घोषणा करण्यात येईल. सर्व संघ घोषित होण्यासाठी जून महिन्याच्या अखेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. तिरंदाजी संघाला अद्यापही ऑलिम्पिक पात्रतेची आशा आहे,’’ असे बत्रा यांनी सांगितले.

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ध्वजवाहकाची जबाबदारी कोणत्या खेळाडूवर सोपवण्यात येते, याची उत्सुकता सर्वानाच लागून राहिलेली असते. ते म्हणाले की, ‘‘याआधी भारताचा एकच ध्वजवाहक असायचा, पण लैंगिक समानतेला योग्य न्याय देत, आता दोन ध्वजवाहक निवडण्यात येतील. करोनामुळे उद्घाटनाचा सोहळा कसा होईल, याचा निर्णय होणे बाकी आहे. पण खेळाडूंचे पोशाख आणि अन्य तयारीला आम्ही प्राधान्य दिले आहे.’’

ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघ कधी रवाना होईल, याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘ऑलिम्पिकसाठी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक आपापल्या स्पर्धेनुसार टोक्योमध्ये दाखल होतील. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील स्पर्धानुसार उद्घाटनाच्या सोहळ्यात भारतीय खेळाडू सहभागी होतील. स्पर्धा संपल्यानंतर दोन दिवसांत टोक्यो सोडावे लागणार असल्याने समारोप सोहळ्यासाठीही सारखेच नियम असतील.’’

स्टेडियमजवळील रस्ते बंद

टोक्यो ऑलिम्पिकला अवघे सहा आठवडे शिल्लक राहिले असताना स्पर्धाच्या ठिकाणांजवळील सर्व रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. नव्याने बांधण्यात आलेल्या नॅशनल स्टेडियमवर २३ जुलै रोजी उद्घाटन सोहळा होणार असून तेथील रस्तेही बंद ठेवण्यात आले आहेत.

२९ निर्वासितांचा संघ

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने  टोक्यो ऑलिम्पिकसाठी २९ जणांचा निर्वासितांचा संघ निवडला आहे. ‘‘विविध देशांतील निर्वासित असलेले २९ खेळाडू १२ क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होतील. ‘आयओसी’च्या कार्यकारी मंडळाने या संघाला मान्यता दिली आहे,’’ असे ‘आयओसी’च्या पत्रकात म्हटले आहे. ‘आयओसी’च्या निर्वासितांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाद्वारे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. दक्षिण सुदान आणि सीरिया येथून पळालेले हे खेळाडू १२ प्रकारांमध्ये भाग घेतील.