शिबा : रवी कुमार दहिया गुरुवारी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये रौप्यपदक पटकावणारा भारताचा दुसरा मल्ल ठरला. उपांत्य फेरीमधील दिमाखदार विजयामुळे सुवर्णपदकासाठी आशा उंचावणाऱ्या रवीचा रशियन ऑलिम्पिक समितीच्या विश्वविजेत्या झॅव्हूर युग्येव्हपुढे निभाव लागला नाही.

पुरुषांच्या फ्रीस्टाईल ५७ किलो वजनी गटात रवीने २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही झॅव्हूरकडून पराभव पत्करला होता. गुरुवारी पुन्हा झॅव्हूरने वर्चस्वपूर्ण खेळाचे प्रदर्शन करताना रवीला ७-४ असे नामोहरम केले. रवीच्या आधी २०१२ मध्ये सुशील कुमारने ऑलिम्पिक कुस्तीची अंतिम फेरी गाठताना रौप्यपदक जिंकले होते. रवीने झॅव्हूरला नमवण्यासाठी आपले सर्व कसब पणाला लावले. परंतु गुणांची आघाडी कायम राखत झॅव्हूरने त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला चोख उत्तर दिले.

हरयाणामधील नाहरी गावचा कुस्तीपटू रवीने सलामीच्या लढतीत कोलंबियाच्या टिग्रेरॉस उर्बानोचा १३-२ असा धुव्वा उडवला. मग उपांत्य फेरीत बल्गेरियाच्या जॉर्जी व्हँगेलोव्हचा १४-४ असा पराभव केला. उपांत्य लढतीत २-९ अशा पिछाडीनंतर रवीने नुरिस्लाम सानायेव्हला चीतपट करीत अंतिम फेरी गाठण्याची किमया साधली.

दीपकचे कांस्यपदक निसटले

ऑलिम्पिक पदार्पणातच कुस्तीपटू दीपक पुनियाच्या कांस्यपदक दृष्टिपथास होते. ८६ किलो वजनी गटात सॅन मारिनोच्या मायलेज नझीम अमिने याने अखेरच्या १० सेकंदांत सामन्याला कलाटणी दिल्यामुळे दीपककडून ते निसटले. दीपकने संपूर्ण सामन्यात नेत्रदीपक बचाव केला. परंतु दीपकच्या पायावर पकड मिळवत अमिने याने मिळवलेले दोन गुण सामन्यासाठी निर्णायक ठरले. दीपकने अनुकूल कार्यक्रमपत्रिकेआधारे उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.

विनेशचा धक्कादायक पराभव

टोक्यो : सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटने निराशा केली. बेलारूसच्या व्हॅनेसा कॅलॅडझिस्कायाकडून पराभवामुळे तिचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. युक्रेनमध्ये वर्षांच्या पूर्वार्धात विनेशकडून झालेल्या पराभवाचे उट्टे फेडत व्हॅनेसाने विनेशला चीतपट केले. त्यानंतर चीनच्या क्विन्यू पांगविरुद्धची लढत व्हॅनेसाने गमावल्यामुळे विनेशचे रॅपिचाजच्या आशाही मावळल्या. ५३ किलो वजनी गटात अग्रमानांकित विनेशने पहिल्या सामन्यात रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेतया सोपिुया मॅटसनला ७-१ असे नामोहरम केले.

अंशू रॅपिचाजमध्ये अपयशी

युवा अंशू मलिकला ५७ किलो वजनी गटाच्या रॅपिचाजमध्ये गाशा गुंडाळावा लागला. रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या रशियाच्या व्हॅरिया कोब्लोव्हाकडून अंशूने १-५ अशा फरकाने हार पत्करली. १९ वर्षीय अंशू सलामीच्या लढतीतच युरोपियन विजेत्या इरिना कुराशिकिनाकडून पराभूत झाली होती. परंतु इरिना अंतिम फेरीत पोहोचल्याने अंशूला रॅपिचाजशी संधी मिळाली.