टोक्योत पॅरालिम्पिक स्पर्धेत दिव्यांगावर मात करत खेळाडू आपली कामगिरी चोख बजावत आहेत. ऑलिम्पिकप्रमाणे पॅरालिम्पिक ही स्पर्धा दिव्यांग आणि अंधासाठी दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारत जगभरातून खेळाडू भाग घेत असतात आणि आपल्या देशाचं नाव आपल्या कर्तृत्वाने गाजवत असतात. या स्पर्धेत अंध खेळाडूंना मार्गदर्शकाची गरज असते. मार्गदर्शकाच्या सुचनेप्रमाणे खेळाडू आपली भूमिका बजावत असतात. या स्पर्धेवेळी एक हृदयस्पर्शी क्षण प्रेक्षकांना अनुभवता आला. मार्गदर्शकाने अंध धावपटू असलेल्या केउला निद्रेया परेरा समेडो हीला सर्वांसमोर लग्नाची मागणी घातली. हा क्षण पाहताना उपस्थित देखील भारावून गेले होते. मार्गदर्शक मॅन्युएल अँटोनियो वाझ दा वेइगाच्या प्रेमाचा केउलाने स्वीकार केला.

टी ११ धावपटू केउलाने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर राहिली. तिचं उपांत्य फेरीतील स्थान थोडक्यासाठी हुकलं. यामुळे ती निराश झाली होती. मात्र काही क्षणातचं तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. मार्गदर्शक मॅन्युअलने गुडघ्यावर बसत तिला लग्नाची मागणी घातली. मॅन्युअलने तिला अंगठी दिली. तिनेही त्याला मिठी मारत त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला.

या हृदयस्पर्शी क्षणामुळे मैदानात उपस्थित असलेले खेळाडूही भारावून गेले. अंध धावपटूंना त्यांचे मार्गदर्शक आता नेमकं काय घडत आहे? याची माहिती देत होते. प्रेमाचा स्वीकार केलं असं सांगताच इतर स्पर्धकांना टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.