कोलकाता : भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतनू दास हे रांची येथील मोराबादी येथे मंगळवारी विवाहबंधनात अडकणार आहेत. या वेळी मुखपट्टय़ा, निर्जंतुकीकरण तसेच सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोनामुळे मिळालेल्या विश्रांतीचा सदुपयोग करत दीपिका आणि अतनू यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निमंत्रण पत्रिकेवरही सरकारच्या टाळेबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘‘पाहुण्यांसाठी आम्ही चोख व्यवस्था केली असून सामाजिक अंतराचे नियम पाळण्यासाठी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. कशालाही स्पर्श होणार नाही तसेच प्रत्येकाने सुरक्षित आणि निरोगी राहावे, हाच आमचा उद्देश आहे,’’ असे दीपिकाने सांगितले.

‘‘पाहुणे आणि नातेवाईकांची आम्ही दोन टप्प्यांत विभागणी के ली असून मोजक्या ६० पाहुण्यांनाच आम्ही निमंत्रण पाठवले आहे. मित्रमंडळी, तिरंदाजीतील सहकारी किंवा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आम्ही निमंत्रित के ले नाही,’’ असेही दीपिका म्हणाली.

आताच लग्न करण्याचा निर्णय का घेतला, याचे उत्तर देताना दीपिकाने सांगितले की, ‘‘टाळेबंदीदरम्यान आम्ही घरीच होतो. सर्व काही बंद असल्याने या वेळेचा सदुपयोग करण्याचे आम्ही ठरवले. एक दिवस आम्हाला लग्न करायचेच होते. त्यामुळे आम्ही ही तारीख निवडली.’’