करोना विषाणूचा सामना करत असताना भारतीय क्रीडाविश्व हळुहळु पुन्हा एकदा सरावाला सुरुवात करत आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील पुलेला गोपिचंद अकादमीत भारतीय बॅडमिंनटपटूंनी सरावाला सुरुवात केली होती. मात्र अवघ्या काही दिवसांत भारताची महिला बॅडमिंटनपटू एन. सिकी रेड्डी आणि फिजीओथेरपिस्ट किरण सी. यांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोपीचंद अकादमीतला सराव थांबवण्यात आला आहे.

सराव सुरु करण्याआधी ‘साई’ने (Sports Authority of India) सर्व खेळाडू त्यांचे प्रशिक्षक व इतर सह सदस्यांना कोविड टेस्ट बंधनकारक केली होती. सिकी रेड्डी आणि किरण यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीशी संपर्क साधून त्यांना चाचणी करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार सर्व काळजी घेऊनच सरावाला सुरुवात करण्याची परवानगी देण्यात आली होती. २०२१ ऑलिम्पिकच्या तारखा जाहीर झालेल्या असताना खेळाडूंना सरावाची गरज असल्याचं सांगत ‘साई’ने ट्रेनिंग कँप सुरु करण्याचं समर्थन केलं आहे.