क्रोएशियाकडून टर्कीवर १-० अशी मात

रिअल माद्रिदचा मध्यरक्षक ल्युका मॉड्रिकने केलेल्या अफलातून गोलच्या बळावर युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या ‘ड’ गटातील साखळी लढतीत रविवारी क्रोएशियाने टर्कीवर १-० अशी मात केली.

अँटे कॅसिक यांच्या मार्गदर्शनाखालील क्रोएशियाचेच वर्चस्व या संपूर्ण सामन्यात दिसून आले. दुसऱ्या सत्रात क्रोएशियाची दोनदा गोल करण्याची संधी हुकली. मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना मॉड्रिकने चेंडू, गोलपोस्टपर्यंतचे अंतर आणि हवेचा झोत या तिन्ही गोष्टींचा विचार करून शानदार गोल केला. टर्कीच्या गोलरक्षकाने उजवीकडे झेपावत गोल रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. ४१व्या मिनिटाला झालेला हाच गोल अखेरीस निर्णायक ठरला.

२००८च्या युरो चषक स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत टर्कीने पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्याचा वचपा क्रोएशियाने घेतला. २०१२च्या युरो पात्रता प्ले-ऑफ लढतीतसुद्धा क्रोएशियाने टर्कीला हरवले होते.

टर्कीच्या ओझान तुफानने केलेला हेडर क्रोएशियाच्या गोलरक्षकाने थोपवला. क्रोएशियाची आघाडी मोडून काढण्यासाठी टर्कीच्या खेळाडूंनी पुरेपूर प्रयत्न केले. दुसऱ्या सत्रात क्रोएशियाने जोरदार आक्रमण करत चेंडूवर नियंत्रण राखले. मात्र टर्कीने बचाव पक्का करत त्यांना आणखी गोल करू दिला नाही. भरपाई वेळेतही टर्कीच्या खेळाडूंनी आटोकाट प्रयत्न केले. परंतु ते अपुरेच ठरले.

गोलवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात टर्कीच्या खेळाडूचे कोपर लागल्याने क्रोएशियाच्या वेदरान कोरलुकाच्या डोक्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली. चेहरा रक्ताळलेला कोरलुक वैद्यकीय उपचारांनंतर लगेचच मैदानात परतला.

टर्कीचे प्रशिक्षक फतिह टेरिम यांनी ४-२-३-१ अशी रणनीती या सामन्यात वापरली.