शेवटच्या मिनिटाला अभिषेकने झळकावलेल्या निर्णायक गोलच्या बळावर भारतीय संघाने १८ वर्षांखालील युवा आशियाई हॉकी स्पर्धेत बांगलादेशला नमवत जेतेपदाची कमाई केली. भारतीय संघाने हा सामना ५-४ अशा फरकाने जिंकला.

बांगलादेशने सामना सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच गोल केला. २२व्या मिनिटाला भारतातर्फे शिवम आनंदने बरोबरी केली. मध्यंतराला मोहसीनने गोल करत बांगलादेशने आघाडी घेतली. ५०व्या मिनिटाला हार्दिकने गोल करत बरोबरी केली. दिलप्रीत सिंगच्या अफलातून गोलच्या बळावर भारताने ३-२ अशी आघाडी घेतली. मात्र नऊ मिनिटांनंतर बांगलादेशतर्फे अशरफुलने शानदार गोल केला आणि ३-३ बरोबरी झाली. इब्युंगो सिंग कोनजेंगमबामने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र बांगलादेशतर्फे महबूब होसेनने गोल केला आणि ४-४ बरोबरी झाली. शेवटच्या मिनिटाला अभिषेकने गोल करत भारताला थरारक विजय मिळवून दिला.