प्रशांत केणी, मुंबई

प्रभादेवीमधील खेडगल्लीच्या प्रवेशद्वारापाशी ‘एके काळचा उभरता, आज सितारा झाला’ हा फलक सर्वाचे लक्ष वेधून घेतो. येथून काही अंतरावर जुनी कौलारू एक मजली अनाजी मास्तर चाळ आहे.. मुंबईतील अन्य चाळींसारखीच अंधारलेली, दिवसादेखील घरात विजेचे दिवे लावावे लागणारी. या १० बाय १०च्या असंख्य घरांपैकी एका घरात अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षांव सुरू होता. कारण वरळीला सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करणारे रोहिदास कापरे यांचा मुलगा अजिंक्यला प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुंबा संघाने १० लाख २५ हजार रुपये बोली लावत संघात स्थान दिले आहे.

मंगळवारी अजिंक्यची प्रो कबड्डीसाठी निवड झाल्याची बातमी कळली आणि त्याचे घर या आनंदात उजळून गेले आहे. घरी येणाऱ्या प्रत्येकाला मिठाई दिली जात आहे. २००६ मध्ये सेंच्युरी मिल बंद पडल्यापासून अजिंक्यचे वडील रोहिदास आठ हजार रुपये पगारावर सुरक्षारक्षकाची नोकरी करतात, तर आई शिवणयंत्रावरील कामे करते. एकूण परिस्थितीशी संघर्ष सुरूच होता. मात्र अजिंक्य शिक्षणासह अनेक स्पर्धामध्ये बक्षिसे मिळवत होता. अजिंक्यची आई म्हणते, ‘‘इतक्या वर्षांत आम्ही कसे राहतो, काय खातो, ही व्यथा कधीही कुणालाही सांगितली नाही. पण ही बातमी समजल्यावर खूप आनंद झाला.’’

अजिंक्यच्या चाळीसमोर त्याने बक्षीस म्हणून मिळवलेल्या दोन बाइक्स आहेत. याशिवाय त्याने दोन वॉशिंग मशीन आणि दोन टीव्ही संचसुद्धा सर्वोत्तम खेळाडूच्या इनामाखातर मिळवले आहेत. असंख्य पदके, करंडक आणि चषकांनी त्याचे छोटेखानी घर भरून गेले आहे. याबाबत अजिंक्य म्हणतो, ‘‘मुंबईकर असल्यामुळे यू मुंबा संघात स्थान मिळाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. घरचे अतिशय खूश आहेत. मित्र आणि नातेवाईकांचे भरपूर फोन आणि मेसेज येत आहेत. ‘भविष्यातील तारे’ स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचे बक्षीस मला मिळाले होते. यासह अनेक स्पर्धामधील कामगिरीमुळे मला प्रो कबड्डीसाठी संधी मिळेल, याची खात्री होती.’’

कबड्डीकडे कसा वळलास, या प्रश्नाला उत्तर देताना अजिंक्य म्हणाला, ‘‘शारदाश्रम विद्यामंदिर शाळेमध्ये पहिली ते चौथीपर्यंत पहिला क्रमांक कायम होता. पाचवीपासून अभ्यासापेक्षा कबड्डी आवडू लागली. शाळेत शेट्टी सरांच्या मार्गदर्शनाखाली घडत गेलो. मग पवन घाग यांनी मला विजय क्लबकडून खेळण्याचा सल्ला दिला. पुढे महर्षी दयानंद महाविद्यालयात राजेश पाडावे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.’’

सध्या भारत पेट्रोलियम संघाकडून व्यावसायिक कबड्डी खेळणाऱ्या अजिंक्यने चार वेळा मुंबईकडून राज्य अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. याशिवाय २०१८च्या राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्राच्या संघात त्याचा समावेश होता. तसेच फेडरेशन चषक स्पर्धेतही त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. पुढे काय ठरवले आहे, याबाबत तो म्हणाला, ‘‘कबड्डीपटू रिशांक देवाडिगाचा आदर्श मी जोपासतो. त्याच्याप्रमाणेच कबड्डीत यशस्वी कारकीर्द घडवायची, असे मी ठरवले आहे.’’