क्रिकेटचे वारे वाहणाऱ्या या देशात सध्याच्या घडीला आणखी एक नाव चर्चेत आले आहे. ते नाव म्हणजे विदर्भाच्या अथर्व तायडेचे. १९ वर्षांखालील कूच बेहर चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये अथर्वने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी करत ३२० धावांचा डोंगर रचला. मध्य प्रदेश संघाच्या विरोधात खेळतेवेळी अथर्वने ही विक्रमी खेळी केली आणि क्रीडा विश्वात त्याच्या नावाच्याही चर्चा रंगल्या.

कारकिर्दीत आपल्या वाट्याला आलेल्या यशाविशयी सांगताना अथर्व म्हणाला, ‘त्या क्षणाला माझ्यावर खूपच दडपण होतं. कारण, त्रिशतकाच्या जवळपासही माझ्या धावांचा आकडा गेला कधीच गेला नव्हता. मुख्य म्हणजे या त्रिशतकासोबतच मला संघाला विजयही मिळवून द्यायचा होता.’

विदर्भाच्या संघाच्या कर्णधारपदी असलेल्या अथर्वने २९४ धावांवर असताना एक चौकार मारला आणि तो तीनशे धावांच्या आणखी जवळ पोहोचला. अखेर २९८ धावांवर पोहोचल्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने दोन धावा काढत त्रिशतकाचा टप्पा गाठला. ४८३ चेंडूंचा सामना करत केलेल्या त्याने खेळलेल्या ३२० धावांच्या या उल्लेखनीय खेळीमध्ये ३४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रणजी क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांनंतरच विदर्भाच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपली सरशी सिद्ध केली आहे. अथर्वच्या ३२० धावांच्या जोरावर त्यांनी मध्य प्रदेशच्या संघासमोर ६१४ धावांचा डोंगर उभा केला. पण, हा पल्ला गाठणं मात्र त्यांना शक्य झालं नाही.

वाचा : लिलाव सुरु होता का बाजार? न्यूझीलंडच्या खेळाडूंची आयपीएलवर नाराजी 

कूच बेहरमधील युवराजच्या खेळीविषयी या गोष्टी माहित आहेत का?
१९९९ मध्ये पार पडलेल्या कूच बेहर चषकाच्या वेळी महेंद्रसिंह धोनीच्या संघाने पहिल्या सत्रात १४२.३ षटकांमध्ये सर्वबाद ३५७ धावा केल्या होत्या. त्यावेळी ‘माहि’ने ८४ धावा केल्या होत्या. धोनीच्या संघाचे हे आव्हान परतवून लावताना पंजाबने २२२ षटकांमध्ये पाच गड्यांच्या मोबदल्यात ८३९ धावा केल्या होत्या. या सामन्यात सर्वाधिक लक्षवेधी बाब ठरली होती, ती म्हणजे युवराजने केलेली फटकेबाजी. धोनीच्या संपूर्ण संघाच्या धावांपेक्षाही युवी एका धावेने पुढे होता. बिहारचा संघ ३५७ धावांवर बाद झाला होता. त्याचवेळी युवीने ३५८ धावांचा डोंगर रचत सर्वांनाच थक्क केले होते. युवीच्या या तुफानी खेळीमध्ये ४० चौकार आणि ६ षटकांरांचा समावेश होता. या सामन्यानंतर १९ वर्षांखालील भारतीय संघाची निवड प्रक्रिया झाली होती. त्यामुळे युवीने आपली कामगिरी चांगली होण्यासाठी सुरूवातीला सावध खेळ केला होता. त्याने १०० धावा होईपर्यंत एकही षटकार मारला नव्हता.