पेंब्रोकशायर काऊंटी क्रिकेट क्लबचे पंच जॉन विल्यम्स यांचा चेंडू डोक्याला लागून मृत्यू झाला. इंग्लंड आणि वेल्समध्ये असलेल्या पेंब्रोकशायर काऊंटी क्रिकेट क्लबने विल्यम्स यांच्या निधनाबाबत ट्विट केले. ८० वर्षाचे विल्यम्स हे डिव्हीजन २ मधील पेंब्रोक विरूद्ध नेरबर्थ या सामन्यात काम पहात होते. १३ जुलैला हा प्रकार घडला. त्यावेळी चेंडू डोक्यावर लागल्यानंतर त्यांच्यावर मैदानावर प्रथमोपचार करण्यात आला आणि त्यांना कार्डिफच्या रूग्णालयात हलवण्यात आले. सुमारे महिनाभर ते कोमामध्ये होते. महिन्याभराच्या उपचाराअंती त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पंच जॉन विल्यम्स यांच्याबद्दल एक दु:खद बातमी आहे. जॉन यांचा रूग्णालयात त्यांचे कु़टुंबीय जवळ असताना मृत्यू झाला. आम्ही सारे त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे ट्विट पेंब्रोकशायर काऊंटी क्रिकेट क्लबकडून करण्यात आले आहे.

विल्यम्स यांच्या बरोबर त्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱ्या मरफीन जॉन यांनी या घटनेबाबत सांगितले की शेवटच्या मिनिटाला आम्ही आमच्या जागांची अदलाबदली केली. चेंडू जेव्हा जोरात विल्यम्स यांच्या दिशेने आला, तेव्हा त्याने बाजूला होणे अपेक्षित होते. पण सामन्यात खेळणारे खेळाडू हे खूपच उंच आणि बलवान आहेत की चेंडू मारल्यानंतर तो अतिशय वेगाने अंगावर आला आणि चेंडू विल्यम्स यांच्या डोक्यावर लागला. जे घडलं ते खूप वाईट आणि दुर्दैवी होते, असेही त्यांनी सांगितले.