संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध आज सामना

आगामी विश्वचषक (१७ वर्षांखालील) स्पध्रेची पूर्वतयारी म्हणून पाहिली जात असलेल्या एएफसी (१६ वर्षांखालील) अजिंक्यपद फुटबॉल स्पध्रेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. फतोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ ‘अ’ गटात संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध सकारात्मक सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच गटातील इराण आणि सौदी अरेबिया यांच्यात उद्घाटनीय सामना होणार आहे.

यजमान भारताकडून घरच्या वातावरणात खेळताना चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. २००२ साली भारताने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती आणि ही भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. जर्मनी आणि नॉर्वे येथे भारतीय संघाने तीन महिने कसून सराव केला. या सराव दौऱ्यात भारताने १९पैकी १२ सामन्यांत विजय मिळवले आहेत. या सरावाचा त्यांना गुरुवारपासून सुरू होणाऱ्या स्पध्रेत नक्की फायदा होईल.

‘स्वकर्तृत्वावर आम्ही या स्पध्रेत पात्र ठरलो आहोत. या स्पध्रेची उपांत्य फेरी गाठून आगामी विश्वचषक स्पध्रेतही गुणवत्तेच्या आधारावर पात्रता मिळवण्याचा आमचा निर्धार आहे,’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक निकोलाई अ‍ॅडम यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘गटात आमच्यासमोर अरब अमिराती, इराण आणि सौदी अरेबियासारख्या तगडय़ा संघाचे आव्हान आहे. विश्वचषक स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टीने ही आमच्यासाठी जमेची बाब आहे.’