विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा

कारकीर्दीत मी आजपर्यंत अनेक रोमहर्षक सामने खेळलो; परंतु विम्बल्डनच्या अंतिम फेरीत फेडररसारख्या मातब्बर खेळाडूविरुद्ध मिळवलेला विजय मला आयुष्यभर स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने व्यक्त केली.

अग्रमानांकित जोकोव्हिचने रविवारी झालेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या चार तास आणि ५७ मिनिटे रंगलेल्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) असे पराभूत केले. हा विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ रंगलेला अंतिम सामना ठरला.

कारकीर्दीत पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद मिळवल्यानंतर जोकोव्हिचने त्याच्या भावना दिलखुलासपणे मांडल्या. ‘‘मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता. त्यामुळेच दडपणाच्या परिस्थितीतही स्वत:वरील संयम मी सोडला नाही. फेडररसारख्या खेळाडूविरुद्ध तुम्हाला एखादी चूक महागात पडू शकते; परंतु दोन मॅच पॉइंट मिळूनही फेडरर पराभूत झाला, असे क्वचितच घडते. जवळपास पाच तास संघर्ष केल्यानंतर मी विजयी ठरल्याचा आनंद आहे. त्यामुळेच कारकीर्दीतील हा सामना मला आयुष्यभरासाठी स्मरणात राहील,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.

संपूर्ण सामन्यादरम्यान फेडररला चाहत्यांचा मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा लाभत होता; परंतु तरीही जोकोव्हिचने स्वत:चा आत्मविश्वास खचू दिला नाही. ‘‘खरे सांगायचे तर चाहते जेव्हाही रॉजर-रॉजरचा पुकारा करत होते, त्या वेळी ते नोव्हाक-नोव्हाक असाच जयघोष करत आहे, असे मी स्वत:ला भासवले. त्यामुळे चाहते कोणाला प्रोत्साहन देत आहेत, याचा माझ्या खेळावर काहीही परिणाम जाणवला नाही. संपूर्ण सामन्यादरम्यान चाहत्यांनी आमच्या खेळाला भरभरून प्रतिसाद दिला. जेव्हा चाहत्यांचा तुमच्या बाजूने पाठिंबा नसतो तेव्हा तुम्हाला स्वत:हूनच प्रेरणा मिळवून खेळावे लागते,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.

जोकोव्हिचच्या नावावर आता १६ ग्रँडस्लॅम विजेतेपदे जमा झाली असून पुरुषांमध्ये त्याच्यापुढे राफेल नदाल (१८) आणि फेडरर (२०) हे दोघेच आहेत. त्यामुळे या विक्रमांविषयी तू विचार करत आहेस का, असे विचारले असता जोकोव्हिच म्हणाला, ‘‘सध्या मी फक्त माझ्या खेळाचा आनंद लुटत आहे. किंबहुना मी ३७ वर्षांपर्यंत खेळेन की नाही, हेसुद्धा अद्याप माहीत नाही. ज्याप्रकारे फेडरर ३७व्या वर्षी खेळत आहे, तेच पाहून मला अखेरच्या क्षणापर्यंत खेळण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे विक्रमांविषयी या वेळी चर्चा न केलेलीच बरी.’’ जोकोव्हिचने गतवर्षी विम्बल्डन, अमेरिकन व वर्षांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. परंतु जून महिन्यात झालेल्या फ्रेंच स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे त्याची ग्रँडस्लॅम विजेतेपदांची मालिका खंडित झाली.

जोकोव्हिच क्रमवारीत अग्रस्थानी कायम

पॅरिस : सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने पुरुषांच्या जागतिक टेनिस क्रमवारीतील अग्रस्थान कायम राखले आहे. जोकोव्हिचच्या खात्यात १२,४१५ गुण जमा असून स्पेनचा राफेल नदाल (७,९४५) आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर (७,४६०) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठणाऱ्या रॉबेर्ट बॉटिस्टाने नऊ स्थानांनी झेप घेत क्रमावारीत प्रथमच १३वे स्थान मिळवले.

बाबरेरा-सु-वेई जोडीला महिला दुहेरीचे विजेतेपद

एकीकडे जोकोव्हिचने फेडररला नमवून पाचव्यांदा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवल्यानंतर सेंटर कोर्टवरच झालेल्या महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत बाबरेरा स्ट्रिकोव्हा आणि शेई सु-वेई यांनी बाजी मारली. चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा आणि तैवानच्या सु-वेई या तिसऱ्या मानांकित जोडीने चौथ्या मानांकित गॅब्रिएला डॅब्रोव्हस्की आणि झू यिफान यांना ६-२, ६-४ अशी सहज धूळ चारली.

विजेतेपदाची सुवर्णसंधी गमावली  – फेडरर

दोन मॅच पॉइंट मिळवण्याची संधी असूनसुद्धा पराभूत झाल्यामुळे फेडररला सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत निराशा लपवता आली नाही. ‘‘या पराभवाचे स्पष्टीकरण करणे अधिक कठीण आहे. मी लवकरात लवकर हा पराभव विसरण्याचे प्रयत्न करेन; परंतु सामना जिंकण्याची सुवर्णसंधी मी गमावली, याची खंत राहील. मात्र जोकोव्हिचला विजयाचे श्रेय देणे आवश्यक आहे. त्याने मोक्याच्या क्षणी संयम बाळगून खेळ केला आणि त्यामुळेच त्याला विजेतेपद मिळवता आले,’’ असे फेडरर म्हणाला. त्याशिवाय ही कारकीर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा नसून यापुढेही जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मी खेळत राहीन, असेही ३७ वर्षीय फेडररने सांगितले.