आरसीएफचे आव्हान संपुष्टात; महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती संघाची आगेकूच
युनियन बँक आणि बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुप या संघांनी पाचगणी व्यायाम मंडळातर्फे अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. याचप्रमाणे महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती संघाने उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात युनियन बँकेने आरसीएफविरुद्धच्या सामन्यात मध्यंतराला एका लोणच्या बळावर १८-७ अशी एकतर्फी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात आरसीएफने चांगला प्रतिकार केला. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना लोणही चढवला, परंतु युनियन बँकेने ३१-२२ अशी बाजी मारली. दमदार चढाया करणारा अजिंक्य कापरे युनियन बँकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. योगेश सावंतची त्याला छान साथ लाभली. भक्कम देहयष्टीच्या रोहित शेठने दुसऱ्या सत्रात एका चढाईत तीन गुण मिळवून सर्वाचे लक्ष वेधले. आरसीएफकडून अनिकेत पाटील आणि सुदेश कुळे यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.
दुसऱ्या सामन्यात बॉम्बे इंजिनीयरिंग ग्रुपने जे. जे. हॉस्पिटल संघाचा १६-८ असा पराभव केला.
महिलांमध्ये रेखा सावंतच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर मुंबईच्या शिवशक्तीने उपनगरच्या संघर्ष संघाचा २५-१५ असा पराभव केला. मध्यंतराला शिवशक्तीने १२-८ अशी आघाडी घेतली होती. मग दुसऱ्या सत्रात शिवशक्तीने एक लोण चढवून आपली आघाडी वाढवली. सोनाली शिंगटेने चमकदार खेळ केला.