News Flash

भारताकडून सुवर्णपदकाची अपेक्षा करणे अयोग्य

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा करणे अयोग्य ठरेल

| March 30, 2016 06:41 am

भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांचे मत; ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सहामध्ये स्थान पटकावण्याचे लक्ष्य
‘‘रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा करणे अयोग्य ठरेल,’’ असे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले.
‘‘आगामी ऑलिम्पिकमध्ये भारताला चिवट लढतींना सामोरे जावे लागणार असून या स्पर्धेत पहिल्या सहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याचे ध्येय ठरविले आहे. त्यापेक्षा चांगली कामगिरी झाली, तर ती आमच्यासाठी लाभदायकच ठरेल,’’ असे ओल्टमन्स म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, ‘‘गतवेळच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला बारावे स्थान मिळाले होते, तर विश्वचषक स्पर्धेत सहावे स्थान मिळाले होते. ही कामगिरी लक्षात घेता ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा करणेच चुकीचे ठरेल. भारतीय लोक हॉकीपटूंकडून सुवर्णपदकाची अपेक्षा करत असतात. आम्ही मात्र त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करत असतो. आम्ही प्रत्येक सामन्यात विजय मिळविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवतो.’’
‘‘स्पर्धेत भारताची कामगिरी कशी होते हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसून आम्ही नियोजनानुसार कसा खेळ करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. संघातील खेळाडू नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप उत्सुक असतात. विशेषत: शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती याच्याबरोबरच खेळाच्या तांत्रिक गोष्टींबाबत जाणून घेण्याचाही ते प्रयत्न करीत आहेत, असे ओल्टमन्स म्हणाले.
भारतीय संघाबाबत ते पुढे म्हणाले की, ‘‘संघात समतोल कसा राहील यावरच माझा भर आहे. त्याचप्रमाणे गोलरक्षणात अधिक सुधारणा करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अर्थात आमच्या संघात जगातील सर्वोत्तम गोलरक्षक आहेत. तरीही ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोणतीही किरकोळ चूक महागात ठरू शकते, त्यामुळेच आम्ही विशेष काळजी घेत आहोत. पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल करण्यात मातब्बर असलेले चार खेळाडू आमच्याकडे आहेत. तरीही आम्ही या तंत्रात अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी कसून सराव करीत आहोत.’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2016 6:41 am

Web Title: unrealistic to expect a gold medal from india at rio olympics hockey coach roelant oltmans
टॅग : India Hockey
Next Stories
1 मेरी कोम, थापा ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेच्या उपांत्य फेरीत
2 जपानच्या टॅगोला नमवून सौरभ मुख्य फेरीत
3 कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विश्वविजेतेपदाच्या शर्यतीतून विश्वनाथन आनंद बाद
Just Now!
X