ज्युआन मार्टीन डेल पोत्रोवर मात करत सर्बियाच्या नोवाक जोकोव्हीचने अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. याआधी जोकोव्हीचने २०११ आणि २०१५ साली अमेरिकन ओपन स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं, अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची जोकोव्हीचची ही आठवी वेळ होती. या विजेतेपदासह जोकोव्हीचने अमेरिकेचा दिग्गज टेनिसपटू पिट सॅम्प्रसच्या १४ ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

या विजेतेपदासह जोकोव्हीच एकूण ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या शर्यतीत राफेल नदालपासून ३ तर रॉजर फेडरपासून ६ विजेतेपदं दूर आहे. मागच्या वर्षी जोकोव्हीचला दुखापतीमुळे अमेरिकन ओपन स्पर्धेमधून माघार घ्यावी लागली होती. मात्र यंदाच्या स्पर्धेत पुनरागमन करत जोकोव्हीचने सर्व कसर भरुन काढली आहे. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हीचने डेल पोत्रोवर ६ – ३, ७- ६(७-४), ६ – ३ अशी मात केली होती. जोकोव्हीचने यंदाचे विम्बल्डन विजेतेपदही आपल्या नावे केले होते. त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला धूळ चारली होती.