कोपा अमेरिका स्पर्धेतील विजयाची मालिका कोलंबियाने अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीतही कायम राखली. यापूर्वी या दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले होते आणि दोन्ही सामन्यांमध्ये कोलंबियाने अमेरिकेला पराभूत केले होते. या तिसऱ्या लढतीमध्ये कोलंबियाने कर्णधार जेम्स रॉड्रिग्स आणि ख्रिस्तियन झापाटा यांच्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर अमेरिकेला २-० असे पराभूत करीत विजयी बोहनी केली.
प्रशिक्षक जर्गन क्लिन्स्मन यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेचा संघ कोलंबियाला धक्का देण्याच्या तयारीत होता. पण कोलंबियाने पहिल्याच सत्रात दोन गोल करीत अमेरिकेला विजयापासून वंचित केले.
सुरुवातीपासूनच कोलंबियाचा संघ आक्रमक होता. सामन्याच्या आठव्या मिनिटालाच झापाटाने पहिला गोल करीत कोलंबियाचे खाते उघडले. यानंतर अमेरिकेने आपला बचाव अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या वेळी कोलंबियाचे गोल करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या सामन्यात रॉड्रिग्स हा लक्षवेधी ठरत होता. कर्णधारपदाला साजेसा खेळत करीत त्याने सामन्याच्या ४२व्या मिनिटाला गोल करीत संघाची आघाडी वाढवली.
कोलंबियाने दुसऱ्या सत्रामध्ये बचावावर अधिक भर देत अमेरिकेचे आक्रमण निष्प्रभ करण्याचे काम चोख बजावले.