जय बिस्ताच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर उत्तराखंडने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क-गटात महाराष्ट्राचा सहा गडी राखून पराभव केला. महाराष्ट्राकडून केदार जाधवची अर्धशतकी खेळी अपयशी ठरली.

रिलायन्स मैदानावर झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद १४१ धावा उभारल्या. ऋतुराज गायकवाड (१९) आणि कर्णधार राहुल त्रिपाठी (२) लवकर बाद झाल्यामुळे महाराष्ट्राची २ बाद २३ अशी अवस्था झाली. मग केदारने नौशाद शेखच्या साथीने तिसऱ्या गडय़ासाठी ३५ धावांची भागीदारी करून डाव सावरला. नौशाद बाद झाल्यावर केदारने अझिम काझीच्या (नाबाद ३१) साथीने चौथ्या गडय़ासाठी ७४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. केदारने ४७ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह ६१ धावा केल्या. केदारने सलग दुसरे अर्धशतक नोंदवले. परंतु तो संघाला विजयी करू शकला नाही.

त्यानंतर, उत्तराखंडचा सलामीवीर कामवीर कौशलने निराशा केली. परंतु दुसरा सलामीवीर जयने अवनिश सुधा (२१), दीक्षांशू नेगी (२३) आणि कुणाल चंडेला (नाबाद १८) यांच्या साथीने ११ चेंडू शिल्लक असतानाच उत्तराखंडचा विजय साजरा केला. जयने ५१ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र : २० षटकांत ४ बाद १४१ (केदार जाधव ६१, अझिम काझी नाबाद ३१; दीक्षांशू नेगी १/१८) पराभूत वि. उत्तराखंड : १८.१ षटकांत ४ बाद १४५ (जय बिस्ता नाबाद ६९, दीक्षांशू नेगी २३; दिव्यांग हिंगणेकर १/११)