News Flash

मातीमध्येच रंगला बुद्धिबळाचा डाव

वेलणकर अकादमीतर्फे गतवर्षीपासून चार एप्रिल हा राज्यभर बुद्धिबळ प्रेरणा दिन साजरा केला जात आहे.

तेली खडूंच्या साहाय्याने गणेश गोरे, अनिकेत धुमाळ, सार्थक कानडे व मंगेश धुमाळ यांनी फरशीवरच बुद्धिबळाचा पट आखला आहे.

इच्छा असेल तर मार्ग आपोआप सापडतो असे आपण नेहमी म्हणत असतो. भाटघर धरणाच्या जलाशयाजवळ असलेल्या पसुरे या खेडेगावातील विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाचे डाव कमी पडले तर चक्क फरशीवर तेली खडूच्या साहाय्याने बुद्धिबळाचा पट आखला व त्यावर बुद्धिबळाच्या सोंगटय़ा मांडून डावही खेळला.

वेलणकर अकादमीतर्फे गतवर्षीपासून चार एप्रिल हा राज्यभर बुद्धिबळ प्रेरणा दिन साजरा केला जात आहे. त्या निमित्त यंदा त्यांनी ग्रामीण भागात या खेळाचा विकास करण्याचे शिवधनुष्य उचलले. राजगडाच्या पायथ्याजवळ पसुरे हे खेडेगाव त्यासाठी त्यांनी निवडले. मकंरद वेलणकर, राघव पठाडे, सोनम ठाकूर, अनुराग गुमास्ते व नीतीश भिडे यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात तेथील विद्यालयात या खेळाचे सराव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. एस. व्ही. जाधव व शिक्षक संजय कडू यांच्या सहकार्याने मुलांपुढे या खेळाची संकल्पना मांडली व अमलात आणली. हा खेळ तेथील मुलांना फारसा माहीतही नव्हता. मुलांमुलींना या खेळाचे बाळकडू देण्यास त्यांनी सुरुवात केली. आठवडय़ातून एक दिवस तेथे जाऊन वेलणकर व त्याच्या सहकारी विनामूल्य मार्गदर्शन करतात. या खेळाचा अभ्यासक्रमच तयार करून त्याद्वारे प्रशिक्षण दिले जाते. त्यांनी तेथे दहा-बारा संचही मोफत दिले आहेत. बघता बघता तेथील मुलामुलींना या खेळाची एवढी गोडी निर्माण झाली की संचही अपुरे पडू लागले. या शाळेतील गणेश गोरे, अनिकेत धुमाळ, सार्थक कानडे व मंगेश धुमाळ यांनी तेली खडूंच्या साहाय्याने बुद्धिबळाचा पट तयार केला. खेळाच्या संचात असलेल्या अतिरिक्त सोंगटय़ांचा उपयोग करीत ते खेळतात.

बुद्धिबळाची एवढी आवड या मुलामुलींना निर्माण झाली आहे, की शाळेतील फावल्या तासाच्या वेळी ही मुले आता हाच खेळ खेळू लागली आहे. सुट्टीच्या दिवशीही शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली ही मुलेमुली बुद्धिबळ खेळत असतात. डी-४, ई-४ अशा तांत्रिक चालीही त्यांच्या ओठावर असतात. एवढेच नव्हे तर प्रत्येकाने एक वही तयार केली असून आपल्या कामगिरीची प्रगती ही मुले स्वत:हूनच त्यामध्ये नोंद करू लागले आहेत. त्यांच्याबरोबर काही शिक्षकही खेळाचा आनंद घेऊ लागले आहेत. खेळाचे संच खराब होऊ नयेत म्हणून मातीवर वृत्तपत्र पसरून त्यावर हा डाव मांडला जातो. शाळेतील एरवी सतत रानावनात मोकाट हिंडणारी मुले एकाग्रतेने हा खेळ खेळू लागल्यामुळे त्यांच्या पालकांनाही आश्चर्य वाटू लागले आहे. मुलांच्या गुणांमध्येही गेल्या तीनचार महिन्यांत वाढ झाली आहे. पुढच्या वर्षी शालेय स्पर्धेत सहभागी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 3:23 am

Web Title: velankar academy to develop chess game in rural areas
Next Stories
1 ग्रँडहोम, वॉटलिंगचा संघर्ष
2 ऑस्ट्रेलियाच्या महिलांना जेतेपद
3 निवासस्थानी इंजेक्शन आढळल्याने भारतीय खेळाडूंची चौकशी
Just Now!
X