News Flash

धोनीसारखे यश मोजक्याच कर्णधारांना- युवराज सिंग

भारतीय संघ इंग्लंडविरुद्द तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार

मोठ्या कालखंडानंतर टीम इंडियामध्ये युवराज सिंगची निवड झाल्यामुळे एकीकडे त्याचे चाहते कमालीचे खूश झाले होते. तर दुसरीकडे त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्याची खिल्लीही उडवण्यात आली होती.

महेंद्रसिंग धोनी याने संघाच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० कर्णधाराच्या पदावरून पायउतार होण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतल्याचे मत युवराज सिंग याने व्यक्त केले आहे. २०१९ सालच्या विश्वचषकाच्या तयारीसाठी आपल्यानंतर संघाच्या कर्णधाराची जबाबदारी युवा खेळाडूने घ्यावी आणि त्याप्रमाणे संघ बांधणी करावी या उद्देशाने धोनीने कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे, असे युवराज म्हणाला. विराट कोहलीमध्ये नक्कीच नेतृत्त्व गुण आहेत आणि आगामी काळात त्यास अनुभवाची जोड मिळेल, असेही तो पुढे म्हणाला. कर्णधारपदाच्या कारकिर्दीत धोनीने केलेल्या अफलातून कामगिरीचे युवराज तोंडभरून कौतुक केले. धोनीच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ट्वेन्टी, एकदिवसीय विश्वचषकासह चॅम्पियन्स करंडक स्पर्धा देखील जिंकली. याशिवाय कसोटी क्रमवारीत संघाने अव्वल स्थान देखील प्राप्त केले. अशी कामगिरी आजवर किती कर्णधारांनी केली आहे हे मला माहित नाही. पण धोनीसारखे यश मोजक्याच कर्णधारांना मिळाले आहे, असेही युवराज सिंगने सांगितले.

 

रणजी विश्वातील लक्षवेधी कामगिरीनंतर युवराज सिंग याचे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेत भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. येत्या १५ जानेवारी रोजी पुण्यात भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. युवराजच्या निवडीनंतर त्याच्या फिटनेसला घेऊन सोशल मीडियावर बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. वाढते वय आणि कॅन्सरवर मात केल्यानंतर निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी फिटनेवर अधिक भर देण्याची गरज असल्याचे खुद्द युवराजने देखील मान्य केले होते. तो म्हणाला की, मी जे काही करेन ते अतिशय काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. फिटनेसचे शास्त्र आता अधिक प्रगत झाले आहे. त्यामुळे मी कशापद्धतीने सराव करतो हे खूप महत्त्वाचे असणार आहे. भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूवर नजर टाकल्यास प्रत्येक जण शारीरिकदृष्ट्या फिट असल्याचे दिसून येते. मानसिक बळ वाढविण्यासाठी तुम्ही शारीरिक पातळीवर फिट असणे महत्त्वाचे आहे.

भारतीय संघ इंग्लंडविरुद्द तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. कसोटी संघाचे यशस्वीरित्या नेतृत्त्व करणाऱया विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाचेही नेतृत्त्व सोपविण्यात आले आहे. धोनी कर्णधार नसला तरी त्याचा भारतीय संघात एक खेळाडू म्हणून समावेश असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2017 5:17 pm

Web Title: very few captains have achieved what ms dhoni has says yuvraj singh
Next Stories
1 सेहवागने ट्विटरवरून तब्बल ३० लाख कमावले!
2 रवी शास्त्रींच्या सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधारांच्या यादीत गांगुलीला स्थान नाही
3 आर.अश्विनचा नेत्रदान करण्याचा कौतुकास्पद निर्णय
Just Now!
X