सध्या इंग्लंडमध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेत गोलंदाज आणि फलंदाज दोघेही आपली विशिष्ट शैली दाखवून छाप सोडत आहेत. पण या दरम्यान इंग्लंडमध्येच सुरु असलेल्या Second XI Championship मध्ये खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरच्या गोलंदाजीची जोरदार चर्चा सुरु आहे. Second XI Championship मध्ये अर्जुन South Group च्या MCC Young Cricketers या संघाकडून खेळत आहे. या संघाकडून गोलंदाजी करतानाचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा गोलंदाज आहे. त्यो गोलंदाजी करताना त्याने फलंदाजांचा उडवलेला त्रिफळा आणि त्याची गोलंदाजीची शैली या दोनही गोष्टी सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर अर्जुनने उडवलेल्या त्रिफळ्याचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत अर्जुनच्या या विकेटचे कौतुक करण्यात आले आहे.

हा पहा व्हिडीओ –

Second XI Championship मध्ये Surrey 2nd XI आणि MCC Young Cricketers या दोन संघांमध्ये हा सामना सुरु आहे. या सामन्यात Surrey 2nd XI संघाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३४० धावांवर डाव घोषित केला. यात अर्जुन तेंडुलकरने ११ षटकात २ निर्धाव षटके फेकत ५० धाव देऊन २ गडी टिपले. यास प्रत्युत्तर म्हणून सामन्याच्या तिसऱ्या दिवशी MCC Young Cricketers संघाने ३३ षटकात ६ बाद ११३ धावा केल्या होत्या.