ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने २ तर हेजलवूडने १ बळी टिपला. या सामन्यात पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने स्लिपमध्ये अप्रतिम झेल टिपला. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्बचा झेल विराटने टिपला आणि तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला.

कोहलीप्रमाणेच भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीतदेखील एका कॅचमुळे चर्चेत आली. हरमनप्रीतने शनिवारी महिला बिग बॅश लीगच्या सामन्यात ‘झक्कास’ झेल टिपला. तो व्हिडिओही तुफान हिट झाला.

अॅडलेड स्ट्रायकर आणि सिडनी थंडर्स यांच्यातील सामन्यात हरमनप्रीतचा झेल चर्चेचा विषय ठरला. हरमनप्रीत सिडनी थंडर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्ट्रायकरने २० षटकांत १३२ धावा फाटकावल्या. सुझी बेट्सने नाबाद ७९ धावांची खेळी करून संघाला मोठी मजल मारून दिली. मात्र, या सामन्याचा तिसऱ्या षटकात हरमनप्रीतने टिपलेला झेल चर्चेचा विषय ठरत आहे. ताहलिया मॅकग्राने टोलावलेला चेंडू मिड ऑफला उभ्या असलेल्या हरमनप्रीतने सुरेख पद्धतीने टिपला.