क्रिकेटला धर्म मानणाऱया आपल्या देशात तरुणाईमध्ये असलेले क्रिकेटचे वेड ही काही नवी गोष्ट नाही. क्रिकेट खेळात असंख्य प्रतिभावान खेळाडू आपल्याला दरवर्षी भारतात घडताना दिसतात. दिल्लीच्या अशाच एका पाच वर्षीय चिमुकल्याने गेल्या दोन वर्षांपासून क्रिकेट चाहत्यांना वेड लावले आहे. रुद्रप्रताप या पाच वर्षीय चिमुकल्याचे फलंदाजी कौशल्य पाहून भलेभले आश्चर्यचकीत झाले होते.

रुद्रप्रतापचा नेट्समध्ये सराव करतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर आता रुद्रप्रतापला थेट एका स्पर्धेत दिल्लीच्या १४ वर्षाखालील संघातून खेळण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेचे दुरदर्शन वाहिनीवर थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. दिल्लीच्या संघातून रुद्रप्रताप फलंदाजीला उतरला होता. रुद्रने या स्पर्धेत देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्यापेक्षा वयाने आणि उंचीने देखील मोठ्या गोलंदाजांचा रुद्र मोठ्या आत्मविश्वासाने सामना करताना या स्पर्धेत दिसून आला.

रुद्रच्या या सामन्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. २० षटकांच्या सामन्यात रुद्रला शेवटचे तीन षटक खेळण्याची संधी मिळाली होती. रुद्रने आपल्या बॅटने काही नजाकती फटके देखील खेळले. रुद्रच्या बॅटमधून चौकार आणि षटकार पाहायला मिळाले नसले तरी त्याची क्रिकेट खेळण्याच्या शैलीने सर्वांची मने जिंकली. गोलंदाजीला निर्धास्त सामोरे जाण्याची रुद्रची कला म्हणजे त्याची एका प्रतिभावान खेळाडूच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. आगामी काळात तो उत्कृष्टरित्या फलंदाजी करताना दिसेल, अशी त्याच्या प्रशिक्षकांना आशा आहे.